बुलडाणा- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील घाटाखालील भागात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. केंद्रीय पथकाने पहिल्या दिवशीच्या दौऱ्यात खामगाव तालुक्यातील ३ गाव शिवारातील हायवे लगतच्या शेतात औपचारिक भेटी देऊन पिकांची पाहणी केली. यानंतर पथकाने बुलडाण्याकडे प्रयाण केले. एकंदरीत हा दौरा फक्त औपचारिक दौरा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या अनुषंगाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे (एनडीएमए) पथक राज्यात पाठविण्यात आले आहे. शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाचे अधिकारी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत आहेत. या पथकाचे नेतृत्व कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.आर.पी सिंह यांनी केले.
सदर पथकाचा दुपारी खामगाव तालुक्यातील कलोरी येथे आगमन झाले. येथे विशाल वामनराव घुले यांच्या सोयाबीन पीक शेताची त्यांनी पाहणी केली. त्यांनतर दुपारी खामगांव तालुक्यातीलच टेंभूर्णा येथे पोहचून त्यांनी नरेश जगन्नाथ चौकसे यांच्या सोयाबीन, ज्वारी पिक शेताची पाहणी केली. उल्लेखनीय म्हणजे, पाहणी झालेले सर्व शेत हे हायवे लगत आहे. त्यानंतर पथकाने खामगाव येथील विश्रामगृहात थांबा घेतला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता खामगाव विश्रामगृह येथून सुटाळा येथे पोहोचले. सुटाळ्याला ज्ञानदेव जगदेव चोपडे यांच्या शेतातील ज्वारी पिकाची पथकाने पाहणी केली.
एकंदरीत हा अधिकाऱ्यांचा दौरा म्हणजे शासनाच्या पैशाचा अपव्यव असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पथकाचे नेतृत्व कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.आर.पी सिंह यांनी केले. त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त पीयूष गोयल, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, अप्पर जिल्हाधिकारी घुबे, खामगावचे तहसीलदार डॉ. शीतल कुमार रसाळ यांच्यासह तलाठी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अहो साहेब आम्ही खाव काय आणि जगावे कसे ?
पेरणीनंतर शासनाने शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी पूर्ण शासन कामाला लावले होते. पीक विमा हप्ता भरायची एक प्रकारे सक्तीच शासनाने केली होती. मात्र, कंपन्यांना भरपाईसाठी सक्ती का करत नाही, या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसह सदस्यांना चांगलेच धारेवर धरीत आम्ही खाव काय आणि जगावे कसे ? असा भावनिक सवाल केला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आर.पी.सिंग यांच्या नेतृत्वातील पथकाने शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेत शिवारांची पाहणी केली.
या वेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामना ठिकठिकाणी करावा लागला. पीक नुकसानीच्या मदतीऐवजी पीक विमा कंपन्यांनी पुकारलेल्या असहकाराच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विमा भरपाई रक्कम जर मिळत नसेल, तर मग विमा संरक्षणाची सक्ती करून शेतकऱ्यांना शक्य नसतानाही त्यांच्याकडून विमा हप्ता का भरून घेता, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारत संबंधित पथकाला निरुत्तर केले.
तर 'लाखो रुपये खर्च करून शेतामध्ये पेरणी केली, मेहनतीला फळही आले, मका सोंगून ठेवली होती तर अद्रक बहरत होती. मात्र, परतीच्या पावसाने सगळे उद्ध्वस्त केले, आता आम्ही जगावे कसे? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसमोर केली. मात्र, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले.
वाढीव मदतीची मागणी होणार
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी सध्या आठ हजार रुपये प्रतिहेक्टर अशी मदत घोषित झाली आहे. मात्र, ही रक्कम तुटपूंजी आहे. ही रक्कम वाढवून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर केली आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाने प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी यापूर्वीच प्रमुख राजकीय पक्षांनी केली आहे.
दौऱ्यांकडे लागले होते सर्वांचेच लक्ष
अवकाळी पावसाने कांदा, मका, बाजरी, कपाशी, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने आजच्या केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याकडे लक्ष लागून होते. केंद्राचे पथक उशिराने दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतात पोहोचले. शेतकरी त्यांची वाट पाहत होते. मात्र, शेतांमध्ये या पथकातील अधिकाऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही.
शेतकऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली व्यथा
शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. दोन महिने झालेल्या पावसाने पिक वाया गेले. पाण्याने शेत तुडुंब भरले होते. कांद्याचे उळे सडले. मक्याला कोंब फुटले. पंधरा दिवस तर शेत साफ करण्यातच गेले. शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत दिली पाहिजे, अशा भावना व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकरी खामगावच्या बाजार समितीमध्ये पोहचले होते. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवून ठेवले. तर अधिकारी वर्गाने बाजार समितीच्या एका वातानुकूलित खोलीत बसून तेथे कागदोपत्री अहवाल बाजार समितीकडून जाणून घेतला.
केंद्रीय पथकाने रस्त्यालगतच्या शेतांचे नुकसान पाहिले. आतील मूळ नुकसान पाहिलेच नाही. दौऱ्यावर लाखो रुपये खर्च होत असताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. केंद्र शासनाने भरीव मदत करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी दिवठाणा येथील शेतकरी बळीराम मोरे यांनी केली आहे.
हेही वाचा- देऊळगाव राजातील कुंभारी गावात पडला आकाशातून पडले यंत्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण