बुलडाणा - साप म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता नसल्याने साप दिसताच भीतीपोटी त्याला मारण्यात येते. तर, 'सर्पमित्र' हे अडचणीत सापडलेल्या सापांना वाचवून जीवनदान देतात. लोकांना जागरुकदेखील करतात. सापांना वाचवून निसर्गाला एकप्रकारे मदत करणाऱ्या सर्पमित्रांची प्रशासनाकडून मात्र पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...
सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून साप पकडणे सुरु केले. आणि सापाला वाचवण्याचा वसा घेत त्यांनी हे काम निरंतर सुरु ठेवले आहे. नागरिकांमधील सापाची असणारी भिती कमी व्हावी म्हणून, रसाळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने वन्यजीव सरंक्षण व निसर्ग पर्यावरण या नावाने संस्था काढली. आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने सर्प जनजागृती करण्यास सुरुवात केली.
या संस्थेच्या माध्यमातून सध्या शंभराहून अधिक सर्पमित्र एकत्र काम करत असून आत्तापर्यंत कित्येक सापांना त्यांनी जीवनदान दिले आहे. परंतु, शासनाने आत्तापर्यंत या सर्पमित्रांच्या कार्याची पाहिजे तशी दखल घेतली नाही. आपला जीव धोक्यात घालून सापांना जीवन देण्याच्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना ओळखपत्र देण्याइतकी साधी दखलही शासनाने घेतली नसल्याची खंत यावेळी रसाळ यांनी व्यक्त केली.