बुलडाणा : खासदार अनिल बोंडे यांच्या विधानानंतर आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्यांनी औकातीमध्ये राहावे असा दम त्यांनी भाजप खासदाराला भरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फुगलेले बेडूक असल्याची प्रतिक्रिया खासदार अनिल बोंडे यांनी दिल्यानंतर बुलढाणा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड चागंलेच आक्रमक झालेले पहायाला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदार हे वाघ आहे. या वाघांनी उठाव केला तेव्हा भाजपच्या लोकांना सत्तेत स्थान मिळाले असे देखील संजय गायकवाड म्हणाले. या मुख्यमंत्र्यांची ताकद आणि वार पचविण्याची हिम्मत भाजपच्या लोकांनी ठेवायला पाहिजे. त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1987 ला भाजपचे फक्त 2 खासदार होते आज ते पण फुगून हत्ती झाले आहेत, अशी बोचरी टीका गायकवाड यांनी केली. ते आज बुलडाणा येथे बोलत होते.
जाहिरातीमुळे राज्यातील राजकारण तापले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल जर अस भाजपचे मंत्री बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे. ठाणे विषयी बोलताना तुम्ही किती होते. कोणाच्या संगतीने महाराष्ट्रात आले, याचा सुद्धा भाजपाने विचार करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंगळवारी झालेल्या जाहिरातीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना या जाहीरनाम्यात स्थान दिले नसल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचा दावा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा कोल्हापूरचा संयुक्त दौरा रद्द केला. त्यामुळे फडणवीस यांची नाराजी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
संजय राऊतांची फडणवीस यांच्यावर टीका : 105 लोकांचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा शिंदे गटाच्या 40 जणांनी पराभव केला आहे. त्यामुळे त्यांच्या कानदुखीचे कारण खरे असू शकते. या जाहिरातीमुळे फडणवीसांचे कान, पोट आणि छातीही दुखणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. या जाहिरातीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे कान दुखत असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यांच्याकडे कान दुखण्याचे खरे कारण आहे. महाराष्ट्रात सध्या जे वार सुरू आहेत, ते वार कोणाच्या कानात घुसले तर कोणाचेही कान दुखू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अवस्था समजून घेतली पाहिजे. शिंदे सरकारलाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.