बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात अटी, शर्तींच्या आधीन राहून देशी-विदेशी दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय झाला. आज सकाळपासूनच तळीरामांनी सागवान परिसरातील देशी दारूच्या दुकानांसमोर सोशल डिस्टन्सचे पालन करत रांगा लावल्या होत्या. यावेळी दुकानदारांनी तळीरामांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करून त्यांना दारू विक्री केली.
दारू मिळण्याच्या आनंदात सर्व तळीराम सकाळीच दारू दुकानांमध्ये पोहोचले. मात्र, दुकाने उघडली असली तरी इथेही दारू मिळवणे सोपे नव्हते. तोंडाला मास्क लावणे, रांगेत उभे राहणे, उभे असताना सोशल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक होते. इतक्या कठोर आराधनेनंतरच त्यांचे 'मदिरालय' त्यांना प्रसन्न होणार होते. यामुळे एरवी दारूसाठी आणि दारूमुळे तोल सुटणारे तळीराम कमालीच्या शिस्तीत होते.
लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली देशी-विदेशी दारुची दुकाने सुरू करण्याच्या वाढत्या मागणीनंतर हे दारूची दुकाने शर्ती, अटींच्या अधीन राहून सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर देशी-विदेशी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला गेला. ही दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू असणार आहेत. सीलबंद दारू विक्री करत असताना ६ फुटांचे अंतर बंधनकारक आहे. परिसरातील राजू जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानाच्या समोर सकाळपासूनच तळीराम जमले होते. त्यांचे हात सॅनिटायजरने स्वच्छ करून त्यांना दारू विक्री केली.
'जो कोणी मास्क लावून येणार नाही त्यांना दारू विक्री करणार नाही. शिवाय, शासनाने दिलेल्या निर्देशांनुसारच दारू विक्री करणार' असे सागवान येथील दारू दुकानदार राजू जयस्वाल यांनी सांगितले.
या परिस्थितीचा आढावा घेतला ईटीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी वसीम शेख यांनी..