बुलडाणा - लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच, जळगाव जामोद वनविभागाने तातडीने कारवाई करत तब्बल दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.
वडशिंगी ते जळगाव जामोद रोडवर लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत होते. यादरम्यान पथकाने एका ट्रकला (एमपी 06 ई 5106) थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात नीम आणि बाभुळ या झाडांच्या लाकडांचे ओंडके दिसून आले. या लाकडांसाठीची कागदपत्रे मागितली असता, चालक वा वाहकाकडे ती आढळून आली नाहीत. त्यामुळे वनविभागाने कारवाई करत ट्रक आणि लाकडे जप्त केली.
सादिक अमीर अली आणि हुसेन अली सादिक या दोघांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल हा दोन लाख 45 हजार रुपयांचा असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या दोघांविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 आणि 52(1) तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964, कलम 3 नुसार कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत उपवनसंरक्षक संजय माळी व रणजित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. खान,वनरक्षक एस.आर. शिंदे, के.एन सलामे वनरक्षक, जी.एस.कुटे वाहन चालक, राजू इंगोले यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा : पवन जल्लाद म्हणतो.. निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकविताना मला आनंद होईल