बुलडाणा - वेळेत उपचार न मिळाल्याने एका नवजात बालकाचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे घडली आहे. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रस्त्यातच बाळंत झालेल्या यशोदाबाई शंकर दुगाने यांना संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातही वेळेत उपचार मिळाले नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
यशोदाबाई यांना 29 नोव्हेंबरला सकाळी प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी पती शंकर दुगाने यांनी शासकीय रुग्णवाहिकेसाठी 108 वर संपर्क साधला. परंतू, रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. खसगी वाहनाने संग्रामपूरला उपचारासाठी आणत असताना त्या रस्त्यातच बाळंत झाल्या. बाळासह त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने तातडीने उपचार होऊ शकले नाही. परिणामी, जन्मलेले बाळ दगावल्याचा आरोप शंकर दुगाने यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.
हेही वाचा - आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्युमुळे पिंपळनेरात तणावाची स्थिती
संग्रामपूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सुटीवर असल्याने वकाना येथे नियुक्त असलेल्या डॉ. उजवणे यांना संग्रामपूर येथील रुग्णालयाचाही कारभार पहावा लागत आहे. दरम्यान, संग्रामपूर ग्रामीण रुग्णालयात दोन आरोग्य सेवकांची पदे रिक्त असल्याची माहितीही समोर आली आहे.