बुलडाणा - शहरापासून काही अंतरावर असलेल्या गिरडा जंगलात शेकडो मृत कुत्र्यांची शव आढळून आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या मृत कुत्र्यांची दुर्गंधी जंगलाजवळील गावांमध्ये पसरली होती. यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मेलेल्या कुत्र्यांची संख्या १०० ते २०० च्या वर असून त्यांना मारण्यासाठी विष प्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना कोणी मारले असावे आणि कशासाठी याची चौकशी होणे गरजेचे आहे.
बुलडाणा शहरानजीक असलेल्या गिरडा या गावाजवळच्या जंगलात शुक्रवारी १०० ते २०० च्यावर कुत्री मृतावस्थेत आढळून आली. चार गंजीत या मृत कुत्र्यांना टाकण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील गिरडा, पाडळी, हनवतखेडसह अनेक गावांमध्ये दुर्गंधी परसली असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यातील सर्व कुत्री पाळीव असल्याचे समोर आले आहे. यात कुत्र्यांच्या पिल्लांचाही समावेश आहे. हात पाय बांधलेल्या कुटीरांमध्ये काही कुत्री जीवित असल्याचेही समोर आले आहे.