बुलडाणा - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'आम्ही बुलडाणेकर' समितीकडून आज (रविवारी) 11 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मदत फेरीमध्ये बुलडाणाकरांनी सढळ हाताने मदत केली. विशेष म्हणजे लहान-मोठ्या व्यावसायकांनी सढळ हाताने पूरग्रस्तांसाठी मदत केली. बुलडाण्याकरांनी जमा केलेला हा निधी पूरग्रस्तांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शनिवारी 10 ऑगस्टला स्थानिक विश्रामगृह येथे 'आम्ही बुलडाणेकर' समितीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. बैठकी दरम्यान, रविवारी 11 ऑगस्टला शहरात फेरी काढून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्याचे ठरवण्यात आले. यानुसार आज (रविवारी) शहरातील संगम चौकातून या मदत फेरीला सुरुवात झाली. यानंतर या फेरीच्या माध्यमातून शहरातील मुख्य मार्ग आणि आठवडी बाजारामध्ये मदत निधी जमा करण्यात आला.
हा निधी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीकरीता खर्च करण्यात येणार आहे. लवकरच जमा झालेल्या निधीची तपशील 'आम्ही बुलडाणेकर' समिती जाहीर करणार आहे.