बुलडाणा- घरामध्ये शस्त्र बाळगणाऱ्या 3 आरोपींना मंगळवारी चिखलीत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. 3 आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरात गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला खबऱ्याकडून तलवार बाळगणाऱ्यांची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी वाल्मिक नगर येथील 23 वर्षीय जितेश सदाशिव नखवाल, छत्रपती नगर येथील 32 वर्षीय नितीन साहेबराव सुरोशे, दीनदयाल नगर वार्ड क्रमांक 12 येथील 29 वर्षीय सुनील सतीश हिवाळे आणि सदानंद नगर येथील 27 वर्षीय प्रवीण रामभाऊ कोल्हे यांच्या घराची झडती घेतली. त्यात पोलिसांना चार तलवारी आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, प्रवीण कोल्हे हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.