बुलडाणा - मनात जिद्द आणि चिकाटी असेल, तर काहीही अशक्य नसल्याचे दाखवले अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रायणी गोमासे-इंगळे या मुलीने. इंद्रायणीने जीवनात काही तरी वेगळं करुन दाखवायची इच्छाशक्ती बाळगून नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन तहसीलदार पदी नियुक्ती मिळवली आहे. इंद्रायणीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ध्येयावर निष्ठा असेल आणि योग्य दिशेच्या प्रयत्नेची साथ असेल, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो असे सांगितले.
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी परिसर तामगाव येथील मुरलीधर गोमासे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे 3 एकर शेती असून आपल्या तीन मुली आणि एका मुलांचे शिक्षण त्यांनी मोठ्या कष्टाने केले. त्यांचे लग्नही केले. घरातील इंद्रायणी ही चारही भाऊ-बहिणीतून सर्वांत मोठी आहे.
इंद्रायणीने कृषी पदविकेत पटकावले 10 पुरस्कार . . .
आयुष्यात काहीतरी नवीन करुन दाखवायचं म्हणून जिद्द चिकाटीने तिनं शिक्षण केले. परिवार शेतकरी असूनही सासरच्यांनी शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवले. याचे फलित म्हणजे इंद्रायणीने कृषी पदविकेत 10 पुरस्कार पटकावले. यात 5 सूवर्ण, 2 रजत तर 3 रोख पुरस्कार आहेत. कृषी पदवी मिळवून शासकीय कार्यालयात नोकरी मिळवली. एवढ्यावरच न थांबता इंद्रायणीने स्पर्धा परीक्षेचा पुणे येथून खासगी शिकवण्यातून अभ्यास करून राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण होऊन ओबीसी प्रवर्गातून महिलांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. आता ती तहसीलदार झाली आहे.
इंद्रायणीचा पती करतो देशसेवा . . .
बीएससी प्रथम वर्षांत असताना इंद्रायणीचा विवाह सोनाळ्याचे केंद्रीय पोलीस दलातील जवान विजय इंगळे यांच्यासोबत झाला. इंद्रायणीचा पती सीआरपीएफमध्ये असून देशाची सेवा करत आहे. लग्न झाल्यानंतर शिकून काय करायचे, घरचं तर सांभाळावे लागते, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. मात्र लग्न झाल्यावरही इंद्रायणीने शिक्षण पूर्ण करून तहसीलदार होत यशाचं शिखर गाठले आहे. इंद्रायणीने या यशाचं श्रेय आई-वडील, पती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलं आहे. मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही हेच इंद्रायणी यांनी दाखवून दिलं आहे. सातपुडा पर्वताच्या खाली वसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने परिस्थितीवर मात करत यश मिळविल्याने इंद्रायणीचे कौतुक होत आहे.