बुलडाणा - जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील जनतेमधून निवडून आलेल्या भाजपाच्या नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांनी भाजपाला राम-राम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून त्यांनी हाती शिवबंधन बांधले आहे. नगराध्यक्षांसह पल्लवी वाजपेयी व मालनबी पठाण या नगरसेविकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
देऊळगाव राजा नगर परिषदेमध्ये भाजपच्या तिकिटावर सुनीता शिंदे ह्या जनतेतून थेट निवडून आल्या होत्या. देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये एकूण १७ सदस्य असून त्यामध्ये ५ शिवसेना , ४ काँग्रेस , ४ राष्ट्रवादी काँग्रेस , ४ भारतीय जनता पार्टी असे निवडून आले होते. परंतु सध्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सुनीता शिंदे, नगरसेवक पल्लवी वाजपेयी , मालनबी पठाण यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला देऊळगाव राजा मतदारसंघात मोठे खिंडार पडले आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये आता भाजपाची १ सदस्य संख्या उरली आहे.
नगराध्यक्षांच्या पतीला लाचलुचपत विभागाने केली होती अटक
अनुकंपावर नोकरीसाठी नगर परिषदेत ठरावाकरिता नगराध्यक्षा यांचे पती डॉ. रामदास शिंदे यांनी १ लाखांची लाच मागितली होती. ८० हजारांत तडजोडी अंती देण्याचे ठरविल्यानंतर तक्रारदाराने तक्रार दिली. यानंतर तक्रारदार यांच्याकडून मागितलेल्या खंडणीपैकी ८० हजारांची लाच घेताना डॉ.रामदास शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
नगराध्यक्षपद जाणार असल्याने प्रवेशाची चर्चा
नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांच्या विरोधात विरोधी नगरसेवकांनी अविश्वास दाखल करून महाराष्ट्र शासनाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी शासनाकडे सुरू होती. दरम्यान, आपले नगराध्यक्षाचे पद जाणार असल्याने सुनीता शिंदे यांना पर्याय नसल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सध्या परिसरात आहे.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांसाठी सक्षम अन्याय निवारण यंत्रणा उभारावी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी