बुलडाणा - मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात पाणी अचानक वाढल्याने येथे चार तरुण पोहताना अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकाचा पाय घसरून दगडावर डोके पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. विजय सुरुशे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो देऊळगाव माळी येथील रहवासी आहे. पाण्यात अडकलेले व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्यांना सुखरूप वाचवण्यासाठी प्रशासन व ग्रामस्थांना यश आले आहे.
देऊळगाव माळी या गावातील शुभम गवई, विजय कुडके, सलमान पठाण, संतोष माने, गोपाल जाधव हे पाच मित्र आज सकाळी कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी गेले होते. सांडव्यात पोहत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने यातील चार तरुण वाहून जात होते. दरम्यान, या सगळ्यांनी झाडाचा आधार घेतल्याने ते वाहून जाण्यापासून बचावले.
हेही वाचा - आठवडाभरात एसटी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही, तर रस्त्यावर उतरु - प्रवीण दरेकर
रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या काही जणांनी हे पाहिले. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यातील तिघांना काढण्यात यश आल्यानंतर उर्वरीतांना वाचवताना विजय पुरुषोत्तम सुरुसे याचा पाय घसरून तो दगडावर पडला. त्याला पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे वाचवण्यासाठी गेलेल्यांनी धीर सोडला होता व तेही पाण्यात अडकले होते. पाण्यात अडकलेले व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासन व ग्रामस्थांना यश आले आहे. यावेळी मेहकर तहसीलदार संजय गरकल व पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली.