बुलडाणा - विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकऱ्यांनी विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापू काळे यांना पाटील यांच्या वाड्यात (मठात) विठ्ठल रुपात दर्शन दिले. तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते भक्त सरळ शेगावात येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रुपात पाहून नतमस्तक होतात.
नाम विठ्ठलाचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे, गण गण गणात बोते, हे भजन श्री हरीचे या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीला ‘श्री’च्या पालखीची नगर परिक्रमा होणार आहे. ‘श्री’ची पालखी दत्त मंदिर, श्रीचे प्रगट स्थळ, महादेव मंदिर मार्गाने गेल्यावर शिवशंकर हरिहर मंदिर आणि मारुती मंदिरांत विश्वस्तांच्या हस्ते त्याची विधिवत पूजा होणार आहे.
शेगावात श्री गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशीचा पारंपरिक सोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. जे भाविक इच्छा असूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ शकले नाही, अशी मंडळी विठ्ठलाचे प्रतिरुप समजल्या जाणाऱ्या गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शनासाठी संत नगरीत दाखल झाले आहेत. आषाढीच्या निमिताने गज, अश्व, श्रींच्या रजतमुखवट्यासह निघणाऱ्या शहर परिक्रमाच्या नयनरम्य कार्यक्रमात सहभागी होतील. संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीचा उत्सवही थाटामाटात आणि हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा केला जातो. यासाठी सर्व नियोजन संस्थानकडून केले जाणार आहे.
संध्याकाळी श्रींच्या मंदिरात आरती झाल्यानंतर टाळकर्यांचा 'रिंगण सोहळा' पार पडणार आहे. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त मंदिर परिसरात हजर राहतात. भक्तीमय वातावरण निर्माण करणारा हा पालखी सोहळा शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन सायंकाळी मंदिरात श्रींची पालखीची आरती होते. प्रमुख मार्गावर सुहासिनींनी सडा टाकून ठिकठिकाणी रांगोळ्या काढतात. पुरुष आणि महिलांची श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी होते. आषाढी एकादशीनिमित्त शहरात महाप्रसाद म्हणून फराळांचे वाटप करण्यात येते. एकंदरीत विदर्भाची पंढरी, अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.