बुलडाणा - कोरोनाचा फटका महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला देखील बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 4 लाख 50 हजार विद्युत ग्राहकांकडे, मार्च व एप्रिल या दोन महिन्याची तब्बल 11 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी येणे आहे. महत्वाची बाब म्हणजे, मे महिन्यातही अपेक्षित भरणा झालेला नाही. यामुळे थकबाकीमध्ये वाढ होईल. साधारण हा आकडा 25 ते 30 कोटी रुपयांपर्यत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातील सर्व महिन्यांचे बिल एकत्र येणार असल्याने आणि सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे घरगुती व व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या बिलात कपात करून, शासनाने व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने उर्वरीत रक्कम टप्याटप्याने भरून घेण्यात यावी, अशी मागणी बुलडाण्यातील चश्माचे व्यवसायिक सज्जू अन्सारी यांनी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात विद्युत वितरण कंपनीचा कारभार बुलडाणा, खामगाव व मलकापूर विभागामार्फत चालतो. जिल्ह्यात औद्योगिक, व्यवसायिक आणि घरगुती असे सगळे मिळून 4 लाख 50 हजारपर्यंत विद्युत ग्राहक आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. या काळात विद्युत ग्राहकांकडून वसुली थांबवण्यात आली आहे. यामुळे जवळपास 30 कोटी पर्यंत थकबाकीचा आकडा जाऊ शकतो, असा अंदाज आहे. दरम्यान, विद्युत वितरण कंपनीला ग्राहकांना आता एकत्र बिल देवून वसुली करावी लागेल. मात्र सध्या ही बिल कशा पद्धतीने वसुली करणार आहेत, याबाबात सांगण्यास अधिक्षक अभियंता देवहाते यांनी नकार दिला आहे.
सज्जू अन्सारी यांचे शहरात चश्माचे दुकान आहे. त्यांना चश्माच्या काचेला आकार देणासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिनसाठी विद्युत पुरवठा लागतो. सद्या लॉकडाऊनमुळे त्याचे दुकान बंद आहे. पण त्यांना तीन महिन्यांपासून येणारे सरासरी बील तर भरावेच लागणार आहे. यामुळे हे बील एकत्रित न घेता, टप्याटप्प्याने भरून घ्यावे, अशी मागणी त्यांनी विद्युत मंडळासह शासनाला केली आहे.
एप्रिल महिन्यातील बिलाची व वसुलीची आकडेवारी -
- बुलडाणा विभाग - विद्युत ग्राहक -1 लाख 45 हजार 957, आकारण्यात आलेले बिल - 5 कोटी 82 लाख रुपये, वसुली केलेली रक्कम - 1 कोटी 95 लाख रूपये, आजपर्यंत थकीत - 16 कोटी 20 लाख रुपये.
- खामगाव विभाग - विद्युत ग्राहक- 1 लाख 60 हजार 604, आकारण्यात आलेले बिल - 6 कोटी 99 लाख रुपये, वसुली केलेली रक्कम - 2 कोटी 23 लाख रुपये, आजपर्यंत थकीत - 15 कोटी 68 लाख रुपये.
- मलकापूर विभाग - विद्युत ग्राहक - 1 लाख 21 हजार 783, आकारण्यात आलेले बिल- 4 कोटी 64 लाख, वसुली केलेली रक्कम - 1 कोटी 61 लाख रुपये, आजपर्यंत थकीत - 7 कोटी 82 लाख रुपये.
दरम्यान, बुलडाण्यातील 4 लाख 27 हजार 765 वीज ग्राहकांनी मार्च महिन्यात म्हणजे लॉकडाऊनच्या आधी वीज बील भरले होते. यामुळे मार्च महिन्यातील थकीत कमी आहे. पण एप्रिल महिन्यामध्ये थकीत वाढली आहे. मे महिन्यात तर विजेचा वापर जास्त होतो. याकारणाने या थकीतमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. सद्यघडीला मे महिना वगळता संपूर्ण जिल्ह्यात 39 कोटी 50 लाखांची थकीत बाकी येणे आहे.