बुलडाणा - जिल्ह्यात नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी विदेशातून आलेल्या 12 पाहुण्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांवर खामगावच्या आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित नऊ जणांना बुलडाण्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात खामगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी मलेशिया आणि इंडोनेशिया येथून हे विदेशी पाहुणे आले आहेत. यात मलेशियातील पाच आणि इंडोनेशियातील सात पाहुण्यांचा समावेश आहे. यातील तीन जणांना सर्दी-खोकल्याची लक्षणे दिसल्याने खामगाव येथे रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे का, याची चाचणी घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल, असे डॉ. प्रेमचंद पंडित यांनी म्हटले आहे.
उर्वरित नऊ जणांना बुलडाणा येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या नऊ पाहुण्यांना चौदा दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये हलवण्यात येईल, अशी माहिती डॉक्टर पंडित यांनी दिली. कोरोना विषाणूचे गांभीर्य पाहता आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.
हेही वाचा - सरकारी कारकून, बांधकाम मजूर ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
हेही वाचा - Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत आढळले आणखी 4 रुग्ण