बुलडाणा - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (10 मार्च) जिल्ह्यामध्ये एका दिवसात 755 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संपूर्ण शहर लॉकडाऊन करावे लागेल का? अशी शंका निर्माण झाली आहे.
या तालुक्यांमध्ये आहेत रुग्ण -
गेल्या चोवीस तासांमध्ये 3 हजार 68 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 755 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यात 141, खामगाव तालुक्यात 68, शेगाव 79, देऊळगाव राजा 80, चिखली 134, मेहकर 48, मलकापूर 5, नांदुरा 78, लोणार 27, मोताळा 32, जळगाव जामोद 32, सिनखेडराजा 27 तर संग्रामपूरमध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. बुलडाणा व चिखली या ठिकाणी रुग्णांची संख्या शंभर पार असल्याने दोन्ही तालुके कोरोना हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येकडे नव्हे तर टक्केवारीकडे प्रशासनाचे लक्ष -
चोवीस तासात 755 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असतानाही जिल्हा प्रशासन मात्र टक्केवारीचे गणित करून रुग्ण संख्या कमी असल्याचे सांगत आहे. 48 तासापूर्वी 31 टक्के कोविडचे रुग्ण होते. मात्र, चोवीस तासापूर्वी रुग्ण संख्यामध्ये वाढ झाली नसून केवळ 24 टक्केच असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. वाढती रुग्ण संख्या कशी कमी करता येईल याकडे न बघता केवळ आकडेमोड करून स्वतःची दुर्बलता झाकण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. जिल्हा प्रशासन निर्बंध घालत आहे मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही रात्री उशिरापर्यंत अनेक अस्थापना सुरू असतात. त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत आहे यातूनच संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.