बुलडाणा- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बुलडाण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेचे ठिकाण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, नियोजन भवन केवळ शासकीय बैठकीसाठी तयार करण्यात आले आहे. नियमाने या कार्यालयात कुठलेही राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत, मात्र सत्तेचा दुरुपयोग करून काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद याठिकाणी घेतली, असा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी केला आहे.
या नियोजन भवनामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांची पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगत परवानगी घेण्यात आली होती. मात्र या पत्रकार परिषदमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा एक शब्दही बोलल्या नाहीत. काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग करत पटोले यांची पत्रकार परिषद घेतली असल्याचा आरोपही आमदार आकाश फुंडकर यांनी केला आहे.
गुरुवारी झाली पत्रकार परिषद-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवारीपासून दोन दिवसासाठी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्याचा आणि कोरोना आजाराचा आढावा घेतल्यानंतर नाना पटोलेंनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी पत्रकार परिषद घेवून पत्रकारांना पक्षाची भूमिका आणि कोरोना संदर्भातील माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष माजी आ.राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई शेळके यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नाना पटोलेंनी पत्रकार परीषद घेतली त्या ठिकाणी राजकीय पत्रकार परिषद घेता येत नाही. तो फक्त शासकीय बैठका आणि शासकीय माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याकरिता तयार केलेले आहे. मी एक आमदार असून भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष सुद्धा आहे. मात्र पक्षाचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्या नियोजन भवनात राजकीय कार्यक्रम किंवा राजकीय पत्रकार कधी परिषद घेतले नाही. बुलडाणा काँग्रेसने त्याच नियोजन भवनात नाना पटोलेंची पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप आमदार आकाश फुंडकर यांनी केला आहे.