बुलडाणा - गांजा तस्करी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवत चॉकलेटच्या रॅपरमध्ये गांजाची पाकिटे तयार करून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गुजरात राज्यात राहणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बारकु शंकर पटेल (42) असे आरोपीचे नाव आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या सतर्कतेने गुरुवारी 2 सप्टेंबरच्या रात्री चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरासमोरील प्रवासी निवाऱ्यात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 40 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत एकूण 2 लाख 75 हजार 400 रुपये इतकी आहे.
आढळली 20 पाकिटे
पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांना रात्रीच्यावेळी चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरासमोरील प्रवासी निवाऱ्यात बॅग घेवून संशयास्पद उभा असलेला एक व्यक्ती दिसून आला. यावेळी त्याला विचारपूस करून बॅगेची झाडाझडती करीत असताना या इसमाने घटनास्थळावरून पळ काढला. याबाबतची माहिती जाधव यांनी ठाणेदार प्रदीप साळुंखे यांना दिल्यानंतर घटनास्थळी पंचासह पथक पोहोचले व बॅगेची पाहणी केली. यावेळी त्यामध्ये चॉकलेटच्या रॅपरमध्ये दोन किलोचे एक पाकिट अशी एकूण 20 पाकिटे आढळून आली. या गांजाची किंमत अंदाजे 7 हजार प्रतिकिलो याप्रमाणे एकूण 2 लाख 75 हजार 400 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
मुंबईला नेत होत गांजा?
आरोपी हा गांजा लक्झरी बसने मुंबई येथे नेत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.