बुलडाणा - बुलडाणा नगर परिषदेच्या हद्दीला लागून असलेले काही ग्रामपंचायतच्या हद्दी नगर परिषदेच्या हद्दीला जोडण्यात येणार आहेत. त्याबाबत संपूर्ण प्रस्ताव तयार झाल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. ते आपल्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
शहराच्या क्षेत्रफळात होणार वाढ -
बुलडाणा नगर परिषदेची हद्द सध्या जवळपास 1 हजार 88 हेक्टर क्षेत्रफळ आहे. तर शहराला लागून असलेले सुंदरखेड, माळविहिर, सावळा, येळगाव, सागवान, जांभळून, हनवतखेड या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला असून बुलडाणा शहराच्या हद्दीला येवून ठेकलेले आहे. म्हणून नगर परिषदेने या विषयावरून सन 2014 ला शहर विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र यावेळी प्रस्तावामध्ये काही तांत्रिक त्रृटी आढळल्या होत्या. या त्रृटीमध्ये बुलडाणा शहरातील गट क्र.58,61,63,67 हे नकाशामध्ये दिसत नव्हते. त्यामुळे शहर विस्तारीकरणाचा प्रस्ताव रखडला होता. मात्र संजय गायकवाड हे सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी शहर विस्तारीकरण प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत त्रृटीमध्ये मिळत नसलेले गट क्रमांक शोधून काढले व प्रस्तावातील त्रृटी दुरू केल्या. त्यामुळे शहर विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शहर जवळील असलेले सुंदरखेड, माळविहिर, सावळा, येळगाव, सागवान, जांभळून, हनवतखेड या ग्रामीण भागाची हद्द गांवासह बुलडाणा शहरात समाविष्ट होणार असून शहराचा जवळपास 4 हजार 64 हेक्टर इतका क्षेत्रफळ वाढणार आहे.
बुलडाणा नगर परिषदेला मिळणार 'अ' दर्जा -
बुलडाणा नगर परिषदेचा अंदाजे एकूण क्षेत्रफळ 1 हजार 88 हेक्टर असून सध्या बुलडाणा नगर परिषदेत 'ब' वर्ग दर्जात समाविष्ट आहे.आता शहर विस्तारीकरणा नंतर शहराची हद्द जवळपास 4 हजार 64 हेक्टर क्षेत्रफळ वाढणार असून लोकसंख्या ही वाढणार असल्याने बुलडाणा नगर परिषदेला 'अ' वर्ग दर्जा प्राप्त होणार आहे. यामुळे नगर परिषदेला विकास कामांच्या दृष्टीकोणातून शासनाकडून भरघोस निधी मिळणार असून शहराच्या विकासामध्ये मोठया प्रमाणात भर पडणार आहे.