बुलडाणा - जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अनेक प्रजातीचे प्राणी-पक्षी बघायला मिळतात. मात्र, या अभयारण्यात अस्वलांची संख्या जास्त असल्याने हे अभयारण्य अस्वलांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळे बऱ्याचदा अस्वलाचे दर्शन होत असते. बुधवारी रात्री असेच एक अस्वल अन्न व पाण्याच्या शोधात अभयारण्याला लागून असलेल्या वरवंड फाट्यावरील एका हॉटेलवर आले होते. यावेळी टेबलवरील सांडलेले अन्न खाताना हॉटेलमधील कामगाराने या अस्वलाला आपल्या कॅमेरात कैद केले. मात्र, यावेळी खायला काहीही नसल्याने या अस्वलाने हॉटेलमधील भट्टी, टेबल व इतर साहित्याची तोडफोड केल्याचे हॉटेल चालकाने सांगितले आहे.
वनविभागाने तत्काळ घ्यावी दखल -
ज्ञानगंगा अभयारण्य अस्वलाचे माहेरघर असल्याने जंगलाला लागून असलेल्या वरवंट फाटा परिसरात अस्वलाचा नेहमीच मुक्त संचार पाहायला मिळतो. आता अन्न पाण्याच्या शोधत अस्वल हे गावाकडे वळताना दिसत आहे. अस्वल हे हिंसक प्राणी असल्याने वनविभागाने तत्काळ याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
हेही वाचा - नाशिकमधील आरोग्य यंत्रणा हतबल; बेडसाठी रुग्णालयांच्या दारात याचना करण्याची रुग्णांवर वेळ