बुलडाणा - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कायदयाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने संपूर्ण देशात संविधान व देश वाचवण्यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून या देशाला कुठे नेवून ठेवणार अशी चिंता वाटत असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केले. तसेच हिंदुसोबत मुस्लीमांचेही देशाच्या जडणघडणीत योगदान असल्याचे आजमी म्हणाले.
देश सध्या अगदी नाजूक अवस्थेतून जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशात लागू करून भाजप प्रणित केंद्र शासनाने हिंदु-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण केला आहे. सर्व धर्म समभाव असलेल्या या देशात हिंदुच्या सोबत मुस्लिमांनीसुद्धा भरीव योगदान दिल्याची इतिहासात नोंद आहे. मात्र, केंद्र शासनाने इतर जाती धर्मांना या कायदयाचा लाभ देवून मुस्लिमांना त्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठीच संपूर्ण देशात संविधान बचाव देश बचाव यासाठी असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. या निर्णयामुळे देशातील मोठमोठया बँका रिकाम्या झाल्याचे अबू आजमी म्हणाले.
अनेक मोठया लोकांनी बँकाचे मोठे कर्ज उचलून देशातून पळ काढला आहे. या बाबीचा सर्वसामान्य लोकांना फटका बसत आहे. यावर चिंता करण्याऐवजी केंद्र शासन हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून देशात जातीयवाद करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याबाबत पुस्तक काढण्यात आल्याबद्दल आजमी यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवराय यांची तुलना कोणासोबतच करता येत नाही. तसेच तशी तुलना करणे म्हणजे शिवरायांना कमी लेखने होय असे आजमी म्हणाले. छत्रपतींच्या राजवटीत आर्मी चिफ म्हणून मुस्लिम व्यक्तीवर जबाबदारी होती असेही आजमी म्हणाले.