बुलडाणा- जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टीमूळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात जवळपास 64 कोटी 34 लाख 20 हजार रुपयांचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानबाबत 'ईटीव्ही भारतने' बातम्या प्रकाशित केल्या होत्या. दरम्यान शासनाकडून बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 47 कोटी 30 लाख 66 हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच सबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
यावर्षी जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला होता. यामध्ये 1 लाख 44 हजार 247 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडे पाठवण्यात आला होता. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 64 कोटी 34 लाख 20 हजार रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात इटीव्ही भारतने सातत्याने बातम्या प्रकाशीत केल्या होत्या.तसेच मदतीसाठी विविध राजकीय पक्षांकडून देखील आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान या सर्वांना यश आले असून, शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 47 कोटी 30 लाख 66 हजार रुपयांचा निधी पाठवला आहे.
कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर 10 हजार तर बागायतीसाठी प्रति हेक्टर 25 हजारांची मदत
या निधीतून ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर 10 हजार तर बागायतीसाठी प्रति हेक्टर 25 हजारांच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे. आता तहसील कार्यालयाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाची यादी बनवण्याचे काम सुरू असून, त्यानंतर रक्कम सबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.
सर्वाधीक 32 कोटी 19 लाखाचा निधी सिंदखेडराजाला
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात अतिवृष्टी व पुरामुळे सर्वाधीक 77 हजार 322 शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधीत झाल्याचा अहवाल पाठविण्यात आला होता. 43 कोटी 77 लाख रुपयांची भरपाईसाठी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 32 कोटी 19 लाख 7 हजार रुपये नुकसानग्रस्तांना मदत मिळणार आहे.
तालुकानिहाय मदतनिधी
बुलडाणा- 1 कोटी 15 लाख 56 हजार
चिखली- 1 कोटी 80 लाख 25 हजार
मोताळा- 2 लाख 36 हजार
मलकापूर- 36 लाख 94 हजार
खामगाव- 79 लाख 90 हजार
शेगाव- 3 कोटी 18 लाख 81 हजार
नांदुरा- 20 लाख 10 हजार
जळगाव जा.- 3 लाख 77 हजार
संग्रामपूर- 36 लाख 43 हजार
मेहकर- 2 कोटी 50 लाख 27 हजार
लोणार- 2 कोटी 78 लाख 59 हजार
दे.राजा- 1 कोटी 97 लाख 55 हजार
सिं.राजा- 32 कोटी 19 लाख 7 हजार