बुलडाणा - कोरोनाची कोणताही लक्षणे नसणाऱ्या 11 तबलिकींपैकी 3 जणांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 24 झाली असून, 15 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील 11 तबलिगींची बुलडाणा तालुका आरोग्य अधिकारी बढे यांच्या पथकाने तपासणी केली होती. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे प्रमाणपत्र त्यांना दिले होते. 11 तबलिगीं सदस्यांपैकी 10 जणांचे स्वॅबचे अहवाल आले असून, यामधून 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी यांनी दिली. विशेष म्हणजे हे तबलिकी सदस्य दिल्ली येथील मरकझच्या कार्यक्रमात गेले नव्हते.
या सर्व तबलिगींचा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक बुलडाणा शहर पोलीस स्टेशनकडून संपूर्ण चौकशी करून अहवाल मागीतला होता. यावेळी अहवालात सांगितल्याप्रमाणे या सर्वांना क्वारंटाईन करून स्वॅबचे नमुने घेण्यासाठी कोरोना स्त्री रुग्णालयात शनिवारी भरती करण्यात आले होते. त्त्यांयानंतर त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 10 चे अहवाल आले असून त्यामध्ये तिघांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अद्याप 1 अहवाल प्रतीक्षेत आहे.
आत्तापर्यंत बुलडाण्यात एकूण मृत व्यक्तीसह 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 15 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आणखी 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.