बुलडाणा - कोविड 19 च्या विषाणू प्रकारातील ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना व योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषाणू प्रादुर्भावावर सध्या 15 वर्षाखालील मुलांना लस उपलब्ध नसल्यामुळे तसेच शाळा सुरू झाल्यामुळे या रोगाचा धोका लहान मुलांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम अन्वये कोविडच्या प्रसार रोखण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळा 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष अध्ययन पद्धतीने बंद ( School Closed in Buldana ) करण्यात येणार आहेत. तसेच या शाळा पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांनी एका आदेशान्वये आज (शुक्रवार) दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत सध्या 67 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत.
31 जानेवारी पर्यंत शाळा बंद -
जिल्ह्यात इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग कोविड 19 च्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्ययन कार्य सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेवून याबाबत 31 जानेवारी 2022 नंतर पुढील आदेश निर्गमीत करण्यात येणार आहे. इयत्ता 9 वी व पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी आरटीपीसीआर किंवा रॅपीड टेस्ट करण्यात यावी. शाळेत सोशल डिस्टसिंग, थर्मल स्कॅनिंग, सॅनीटायझेशन व मास्कचा वापर करून सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या कालावधीत सर्व शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच सर्व शिक्षकांनी 15 वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने पुर्ण करून घ्यावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा, फौजदारी प्रक्रिया संहीतामधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.
जिल्ह्यात सध्या 67 अहवाल पॉझिटिव्ह -
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 829 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 813 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 13 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 212 तर रॅपिड टेस्टमधील 601 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 813 अहवाल निगेटीव्ह आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत.