बुलडाणा - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांचा कारावास, तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने आणखी कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयाने शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. विजय उर्फ गबू कैलास असे या आरोपीचे नाव आहे.
पीडीत मुलीच्या वडिलांनी रायपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २४ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता ते व त्यांची पत्नी जेवण करत होते. यावेळी पीडित मुलगी पाणी आणते असं सांगून घराच्या बाहेर पडली. मात्र ती घरी परतलीच नाही. तीच्या घरच्यांनी या मुलीचा सर्वत्र शोध घेतला. शेवटी मुलगी मिळत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून मुलीचा शोध सुरू केला.
पीडिता मध्य प्रदेशात असल्याची मिळाली माहिती-
तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास चार महिन्यानंतर आपली मुलगी मध्यप्रदेशात असल्याची माहिती तिच्या वडिलांना मिळाली. वडिलांनी याबाबत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तपास अधिकारी सुनिल कांतीकर यांनी पोलीस कर्मचारी सुरेश मोरे यांना सोबत घेवून मध्यप्रदेश येथील पिपलानी पोलीस स्टेशन गाठले. या ठिकाणी आरोपीसह पीडित मुलीचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यानंतर पीडित मुलीला विचारपूस केली असता, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याची माहिती समोर आली. पीडितेच्या जबाबावरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये फिर्यादी, पीडिता, आदिवासी समाजाचे तत्कालीन अध्यक्ष संदीप बरडे, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. निवृत्ती देवकर व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सर्व पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांचा कारावास, तसेच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने आणखी कारावास अशी शिक्षा सुनावली.