भंडारा - पडद्यावर हिरो असलेले अभिनेते खऱ्या आयुष्यात कसे झिरो आहेत, हे दाखविण्यासाठी आम्ही अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा विरोध नेहमीच करू. मात्र, ते लोकशाही पद्धतीने. या दोघांचे शूटिंग आणि चित्रपट जिथे कुठे चालू असतील तिथे काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून विरोध करतील. त्यामुळे, मी माझ्या वक्तव्यावरून कोणताही घुमजाव केला नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'ईटीव्ही भारत' च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
हेही वाचा - भंडारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळले
तसेच, गिरीश महाजन हे खुप छोटे नेते असल्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही, असेही पटोले यांनी सांगितले. तर, राठोड यांच्याविरुद्ध सध्या मीडिया ट्रायल सुरू असून वास्तव पुढे आल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका मांडेल, असेही त्यांनी सांगितले.
अमिताभ आणि अक्षयचा विरोध कायम
काँग्रेस सत्तेवर असताना सतत ट्विटरच्या माध्यमातून शासनावर ताशेरे ओढणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार भाजप शासनात पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर गगनाला भिडल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. या अभिनेत्यांची शूटिंग आणि चित्रपट बंद पाडू, असे वक्तव्य 18 तारखेला नाना पटोले यांनी केल्यानंतर हा विषय प्रचंड गाजला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केल्याचे बोलले जात होते. या विषयी नाना पटोले यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, पडद्यावर हिरो असणारे हे खऱ्या आयुष्यात कसे झिरो आहेत, हे आम्ही लोकांना दाखवून देऊ. ह टिवटिव करणारी लोक आता शांत का? अशा लोकांचा आम्ही सातत्याने विरोध करू. हा विरोध आम्ही लोकशाही पद्धतीने करू. जिथे कुठे यांची शूटिंग किंवा चित्रपट सुरू असेल तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन सतत विरोध करत राहील. त्यामुळे, मी माझ्या वक्तव्यावरून घुमजाव केलेला नाही, असे ठामपणे पटोले यांनी सांगितले.
गिरीश महाजन हे खूप छोटे नेते
गिरीश महाजन हे खूप छोटे नेते आहेत. महाजन यांनी, मुघलशाही सुरू आहे का? नाना पटोले यांनी चित्रपट बंद पाडून दाखवावे, असे भाष्य केले होते. त्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया विचारली असता, गिरीश महाजन हे खूप छोटे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करण्याची मला गरज नाही, असे सांगितले. राहिला प्रश्न मुघलाई शासनाचा, हा काँग्रेसने नाही तर भाजपने नागरिकांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शासनाने हुकूमशाही पद्धत दाखविली, ती खऱ्या अर्थाने मुघलाई आहे, असे पटोले यांनी सांगितले.
संजय राठोड यांची सध्या मीडिया ट्रायल सुरू
संजय राठोड यांच्याविषयी विचारले असता, राठोड यांची सध्या मीडिया ट्रायल सुरू आहे. जोपर्यंत वास्तविक परिस्थिती पुढे येत नाही, तोपर्यंत हा विषय मीडिया ट्रायल राहील. वास्तविक परिस्थिती पुढे आल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. सुशांतसिंह राजपूत यांच्या प्रकरणात भाजपने गोंधळ निर्माण केला होता. मात्र, सीबीआय जवळ हा तपास असतानाही अजूनही त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही, त्याच पद्धतीने संजय राठोड यांच्याविषयी निव्वळ गोंधळ घालण्याचे काम भाजप करत असल्याचे पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - भंडारा : विहिरीचे खोदकाम सुरू असताना माती खचली; एकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू