भंडारा - आधुनिक काळात लग्न म्हणजे पैशाची उधळण आणि लॉकडाऊनच्या काळात लग्न करणे अतिशय कठीण कार्य आहे. लग्नाची परवानगी मिळविण्यासाठी उपविभागीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. मात्र, या सर्वांना बगल देत आणि अगदीच कमी खर्चात मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील संतोष मोहन शरणागत याने आपली वरात अगदी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवर काढली. बऱ्याच कालावधीनंतर बैलगाडीवरील नवरदेव पाहायला मिळाल्याने उसर्रा ते सालई खुर्द गावात आणि सोशल मीडियावर वरातीची चांगलीच चर्चा झाली.
उसर्रा गावातील नवरदेव संतोष शरणागत याला आई-वडील नसल्याने सर्व जवाबदारी जावई किशोर भैरम, बहीण किरण भैरम, यांनी घेतली. आपल्या भावाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडू, अशी बहिणीची इच्छा होती. मात्र, त्यांनी लॉकडाऊन मुळे विचार बदलला. फक्त 50 लोकांना लग्नाची परवानगी असल्याने जास्त नातेवाईकांना बोलवणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्वांनी अगदी कमी खर्चात लग्न करण्याचे ठरवले. वर वधू दोन्ही ग्रामीण भागातील असल्याने अगदी जुन्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरले.
जुन्या काळात बस, ट्रक, चारचाकी, किंवा दुचाकी ही साधने नसल्याने वरात नेहमी बैलगाडीवर जायची. यामुळेच जुनी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी संतोषची बहीण आणि जावयाने वरातीसाठी बैलगाडी सजवली. त्याच्या साथीने अजून एक बैलगाडी घेऊन डफळ्याच्या तालावर नाचत हे वऱ्हाड उसर्रा येथून निघाले. बऱ्याच वर्षानंतर बैलगाडीवरील वऱ्हाड बघितल्याने गावातील जुन्या व्यक्तींना त्यांचा काळ आठवला. तर नवीन पिढीला जुन्या परंपरेविषयी माहिती झाली. या रस्त्यावरून जाणार प्रत्येक व्यक्ती या अनोख्या वरतीकडे पाहत होता. तर काहींनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा काढले.
उसर्रा गावातील लोकांसाठी ही वरात जशी कौतुकाची ठरली तशीच परिस्थिती वधूच्या म्हणजे सालई खुर्द च्या गावकऱ्यांची होती. लग्नासाठी कोणतेही सभागृह किंवा शाळा बुक केली नव्हती तर लग्न हे वधूच्या घरीच पळसाच्या पानाच्या मांडावाखाली पार पडले. या लग्नावेळी पावसाने हजेरी लावली. तर लग्नात बुफे न ठेवता पंगत ठेवून लोकांना जेवण दिले गेले. आधुनिक काळात लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, अगदी साध्या आणि पारंपरिक लग्नामुळे परंपरा जपत अतिरिक्त खर्च या वधू-वराकडील मंडळींनी टाळला.