भंडारा - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील घरफोडीच्या घटनेसंबंधी २ अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्यांनी मोहाडी तालुक्यात केलेल्या चोरीही उघड झाल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच घरफोडीच्या घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या उन्हाळ्यात भंडारा जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पोलिसांच्या बऱ्याच प्रयत्नानंतरही चोराचा सुगावा लागत नव्हता. चोर नेहमी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार व्हायचे. 30 जून ला मोहाडी तालुक्यात गणपत गायकवाड (रा. सुभाष वार्ड, मोहाडी) हे सासुरवाडीला गेले असता, त्यांच्याकडे चोरी झाली. शेजाऱ्यांकडून चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरांनी त्यांच्या घरातून 12,000 रोकड, दोन सोन्याच्या आंगठ्या, दोन सोन्याचे हार, एक सोन्याची साखळी, तीन सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, सोन्याचे पेंडंट, चांदीच्या पायपट्ट्या व कमरबंद, असा एकूण 4 लाख 53 हजारांचा मुद्देमाल पळवला होता.
या चोरीनंतर पोलीस अधीक्षक अरविंद सावळे यांनी चोरांना पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. सतत महिनाभराच्या तपासानंतर मंगळवारी त्यांनी जवाहर नगर इथून लड्डू उर्फ जितेंद्र नरेंद्रसिंग तोमर (28 रा. काजी नगर, भंडारा) आणि चंद्रशेखर निपाने (रा. सुभाष वार्ड, मोहाडी) या दोघांना अटक केली. हे दोन्ही सराईत गुन्हेगार असल्याने त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोहाडी येथील चोरीची कबुली दिली. या चोरट्यांकडून नगदी वगळता सर्व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांवर अगोदरही घरफोडीचे गुन्हे असल्याने उन्हाळ्याच्या काळात झालेल्या चोरीचे बरेच गुन्हे पुढे येण्याची शक्यता पोलीस अधीक्षकांनी वर्तवली आहे.