भंडारा- सिरसोली गावातील शिवलाल लिल्हारे यांचे घर पाडल्याच्या विरोधात त्यांची दोन मुले मोहाडी तहसील कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवलाल यांचे घर पाडल्यानंतर त्यांना ५ लाख देण्याचे आणि घरबांधेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये राहू देण्याचे आदेश मोहाडी तहसीलदारांनी दिले होते. मात्र, तहसीलदारांनी ८ दिवसात जुने आदेश रद्द केले असून, शिवलाल यांना ग्रामपंचायमधून निघून जाण्याचे पत्र पाठविले आहे. यामुळे हे प्रकरण अजून चिघळणार आहे.
३० मे ला मोहाडी तालुक्याच्या सिरसोली गावातील शिवलाल लिल्हारे यांचे घर जमीनदोस्त करण्यात आले होते. हे घर शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून बांधले आहे, असे सांगत सरपंचाने नायब तहसीलदार यांना हाताशी घेत जेसीबीद्वारे हे घर पाडले. विशेष म्हणजे त्यावेळी शिवलाल हे रुग्णालयात भरती होते. त्यांच्या अनुस्थितीतही कार्यवाही करण्यात आली.
तहसीलदारांचा घमुजाव, दिलेले आदेश केले रद्द-
यानंतर गावकऱ्यांनी झालेल्या अन्याया विरोधात आंदोलन करीत तहसीलदार यांचा घेराव घातला होता. तेव्हा तहसीलदारांनी शिवलाल यांचे घर पाडण्याची कार्यवाही चुकीची असल्याचे मान्य केले आणि हे आदेश देणाऱ्या नायब तहसीलदार यांच्याकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्याचे आदेश दिले. तसेच घर बाधेपर्यंत शिवलाल हे कुटुंबासह ग्रामपंचायतमध्ये राहतील असेही आदेशही तहसीलदारांनी दिले. मात्र, आता त्यांना नवीन साक्षात्कार झाला आणि घुमजाव करीत स्वतः चे दिलेले आदेश रद्द करीत शिवलाल यांनी ग्रामपंचायत इमारतीमधून निघून जाण्याचे नवीन आदेश काढले.
त्यामुळे वडिलांवर होत असलेल्या अन्याया विरोधात शिवलाल यांच्या दोन्ही मुलांनी मोहाडी तहसील कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणा दरम्यान दोघांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
.मोहाडी तहासीलदारांनी ज्या पद्धतीने ८ दिवसात आपले निर्णय फिरविले. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता हे प्रकरण शिवलाल लिल्हारे आणि सरपंच यांच्यात राहिले नसून भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे झाले आहे. तहसीलदारांच्या निर्णयामुळे आता हे प्रकरण अजून चिघळणार असल्याचे संकेत ग्रामस्थांनी दिले आहेत.