भंडारा - प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शिवशाही वातानुकूलित बस सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्ह्यातील तीव्र तापमानाचा फटका शिवशाहीला बसत आहे. दुपारी बस धावत असताना अनेक बसच्या वातानुकूलित यंत्रणा व्यवस्थित चालत नाहीत. तर, काही वेळा यंत्रणा पूर्ण बंद पडण्याचा घटना घडत आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, तुमसर आणि साकोली या ४ आगारात १८ शिवशाही बस आहेत. यापैकी १५ बस महामंडळाच्या आहेत तर, ३ बस खासगी आहेत. काही बस दीडवर्ष जुन्या आणि काही नवीन आहेत. जुन्या बसमध्ये बऱ्याच गोष्टी या तुटलेल्या आहेत किंवा तुटलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूरवरून भंडाऱ्याला येणाऱ्या बसमधील वातानुकूलित यंत्रणा पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे ४५ डिग्री तापमानात प्रवाशांना त्रासदायक प्रवास करावा लागला होता. यानंतरही भंडारा-नागपूर बसची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना पैसे देवूनही चांगली सेवा मिळत नाही. याउलट चालक प्रवाशांची उर्मटपणे वागल्याचा अनुभव प्रवाशांना आला. त्यामुळे प्रवाशांनी लेखी तक्रारही केली आहे.
शिवशाही ही आधुनिक बस आहे. तिचा देखभाल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. मात्र, भंडारा विभागात अशी यंत्रणा नाही. येथील कर्मचारी जुन्या पद्धतीनेच गाडीची देखभाल करताता. बऱ्याच वेळेस गाड्यांचे सामान मिळत नसले तर कर्मचारी तात्पुरती डागडुजी करुन गाड्या सोडतात, अशा प्रतिक्रिया भंडारा येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत.
शिवशाही बसबद्दल बोलताना विभागीय वाहतूक अधिकारी म्हणाले, की एप्रिल महिन्यात भंडारा विभागातील शिवशाही बसने भंडारा-नागपूर मार्गावर ४५ लाख ७७ हजार एवढे उत्पन्न मिळवून दिले आहे. आम्ही नेहमीच प्रवाशांच्या सुविधेचा विचार करतो. सध्या तापमान जास्त असल्याने एखाद्या गाडीची यंत्रणा बंद पडल्यास आम्ही पर्यायी व्यवस्था करतो. दररोज गाड्यांची देखभाल केली जात आहे.