भंडारा - साकोली तालुक्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या एका तरुणीने नोकरीच्या मागे न धावता पुरुषाचे वर्चस्व असलेल्या ट्रॅक्टर रिपेरिंगच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यातही याच क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे ध्येय या तरुणीचे असून, तिच्या या वेगळ्या निर्णयाचे कौतुक सर्वत्र होत आहे. धनश्री हातझाडे असं या मुलीचे नाव असून ती सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सत्राची ऑनलाईन परीक्षा घरूनच देत आहे.
धनश्री हातझाडे ट्रॅक्टर दुरुस्त करताना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर धनश्री साकोलीला तिच्या घरी परतली. साकोली मध्ये तिच्या वडिलांचा ट्रॅक्टर रिपेरिंगचे नावाजलेले गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये जवळपास बारा लोक काम करतात. धनश्री शिक्षण घेत असल्यामुळे तिने कधीही गॅरेजमध्ये काम केले नव्हते किंवा तसा विचारही कधी केला नव्हता. मात्र एक दिवशी जवळपास सहा ते सात ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी आले. मात्र त्यादिवशी एकही कर्मचारी गॅरेजमध्ये आला नव्हता. हीच संधी साधून धनश्रीने वडिलांच्या परवानगीने तिची चुणूक दाखवून दिली. इथूनच धनश्रीच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळाले. तिने याच व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
धनश्री हातझाडे ट्रॅक्टर दुरुस्त करताना सुरुवातीला धनश्रीला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. नागरिकांनी तिच्या वडिलांना या निर्णयावर फेरविचार करण्याचेही सांगितले. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करीत वडील पोरीच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर मागील चार महिन्यापासून धनश्री नित्यनियमाने गॅरेजमध्ये ट्रॅक्टर रिपेरिंगचे हे कठीण काम अतिशय सहजपणे पूर्ण करीत आहे. ती स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे तिने मागील चार वर्षात जे शिक्षण घेतले त्याचा फायदा ते इथे करून घेत आहेत. तर प्रॅक्टिकल नॉलेज असलेल्या तिच्या वडिलांकडून आणि इतरांकडून अधिक ज्ञान मिळवून या कामात निपुणता आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
अभियंता तरुणीने निवडला वेगळा मार्ग योगायोगाने या कामात जरी धनश्री आली असली तरी, भविष्यात तिला अभियंता बनून इतरांकडे नोकरी न करता स्वतःच्या वडिलाचा हा ट्रॅक्टरचे गॅरेज सांभाळायचे आहे. मी जेव्हा इतर लोकांना नोकरी देऊ शकतो, काम देऊ शकतो, तेव्हा मी इतरांकडे नोकरी का करावी? असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीने एक निपून मेकॅनिक म्हणून तिच्या वडिलांची ख्याती आहे तशीच किंवा त्यापेक्षा चांगली ओळख या क्षेत्रात तिला निर्माण करायची आहे.
धनश्री हातझाडे ट्रॅक्टर दुरुस्त करताना तिने निवडलेले या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती अशा क्षेत्रात पहिल्यांदाच एका तरुणीने पाऊल ठेवले आहे आणि ती तरुणी ही माझी मुलगी आहे, याचा मला अभिमान वाटतो आहे. ती जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील बहुदा पहिली ट्रॅक्टर मेकॅनिक असलेली महिला असावी, असा विश्वास तिच्या वडिलांचा आहे.उच्चशिक्षित झाल्यावर एखादी चांगली नोकरी करून मोठा पगार धनश्री कमी होऊ शकली असती. मात्र तिने चोखळलेला हा मार्ग तिला भविष्यात एक वेगळी ओळख निर्माण करून देईल, यात शंका नाही.