भंडारा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे नागपूर विद्यापीठामध्ये होणाऱ्या उन्हाळी आणि हिवाळी सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेचे निकाल विद्यार्थांना आता त्यांच्या मोबाईल वर एसएमएसद्वारे मिळणार आहेत. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांतील सव्वाचार लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
पदवीधर मतदारसंघाचे सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट सभेच्या बैठकीत हा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. याला सभागृहातील समस्त सदस्यांनी समर्थन देत बहुमताने पारित केला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या वेळ आणि पैशांची बचत होईल. तसेच, परीक्षेचे नियोजन करता येईल.
विद्यापीठाच्या हिवाळी सत्रात सुमारे एक हजार तर, उन्हाळी सत्रात जवळपास 1 हजार 250 परीक्षांचे आयोजन होते. सेमिस्टर पद्धतीने परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परीक्षेत नापास विद्यार्थ्यांना एका वेळी दोन ते तीन परीक्षांचा सामना करावा लागत होता. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था तर अतिशय दयनीय आहे. मात्र या निकालामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवर परीक्षांच्या वेळापत्रकाची सूचना एसएमएसद्वारे ताबडतोब मिळणार आहे. हिवाळ्याच्या सत्रापासून ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा - धुलिवंदन सणावर 'कोरोना' विषाणूची दहशत; समुद्र किनारी पर्यटकांची तुरळक गर्दी
विद्यापीठाचा निकाल आल्यानंतर पुनर्तपासणीसाठी फक्त 7 दिवसांचीच मुदत असते. मात्र, निकालाची माहिती नसल्याने अनेक विद्यार्थी रिव्हॅल्युएशनच्या सुविधेला मुकत होते. एवढेच नव्हे तर, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत होते. संबंधित महाविद्यालये सुद्धा त्यांना योग्य व पुरेशी माहिती देत नव्हती.
विशेष म्हणजे निकालाची सूचना न मिळाल्याने पुढील परीक्षेचा अर्ज करीत असताना एक महिना किंवा जास्त विलंब झाल्यास त्यांना एक हजार पाचशे रूपये ते 14 हजार रूपये विलंब शुल्क भरावे लागत असे. यामुळे विद्यापीठात लाखो रुपये विलंब शुल्क जमा होत असे. या निर्णयाने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात थांबणार आहे.
या सुविधेचा फायदा नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यातील सव्वाचार लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
या निर्णयाने एसएमएस सोयीसाठी नागपूर विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करावी लागणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूर विद्यापीठात भविष्यात मोठे बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उदापूरे म्हणाले. यात प्रत्येक परीक्षेत सर्वोच्च गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका वेबसाईटवर उपलब्ध करणे, सर्व सुविधांचे अर्ज, पदवी, गुणपत्रक ऑनलाइन करणे आदींचा समावेश असेल.
हेही वाचा - भाऊचा धक्का ते मांडवा 'रोरो बोटी'ची चाचणी सुरू, 'प्रोटो प्रोसेस' मांडवा बंदरात