भंडारा - धरणाच्या पाण्यामुळे भंडारा जिल्ह्यात आलेला पूर आता ओसरला आहे. मात्र, जिल्ह्यात आता आरोप-प्रत्यारोपांचा पूर आला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या मते हा पूर मध्य प्रदेशच्या चुकीमुळे आला आहे. तर खासदार सुनील मेंढे यांच्या मते हा पूर म्हणजे प्रशासनाचे अपयश आहे. प्रशासनातील लोकांना या पाण्याचा अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या पुराचा सामना नागरिकांना करावा लागला. मेंढे यांच्या या आरोपावर जिल्हाधिकाऱ्यांनी संयमी भूमिका दाखवत याचा योग्य अभ्यास करूनच नेमके कारण सांगता येईल असे सांगितले.
जिल्ह्यात आलेला महापूर हा मध्यप्रदेश शासनाने केलेल्या चुकीमुळे आल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशने त्यांच्या धरणातील पाणी सोडण्यागोदर भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना पूर्व कल्पना दिली नव्हती. त्यामुळेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना या भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागले, असे त्यांनी म्हटले आहे.
पटोले यांच्या विधानानंतर भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांचे विधान म्हणजे आपली जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. खरे तर, मध्य प्रदेशच्या संजय सरोवरमधून याअगोदरही बरेचदा पाणी सोडले गेले. किंबहुना यावर्षी सोडलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी याअगोदर सोडले गेले. मात्र या वर्षी भंडारा प्रशासनातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले. अधिकाऱ्यांना नेमके पाणी किती सोडले गेले आणि ते भंडाऱ्यात पोहोचल्यानंतर भंडाऱ्यातील वैनगंगा नदीची पाणीपातळी किती वाढेल, याचा अंदाज बांधता आला नाही. मध्यप्रदेशातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी जिल्ह्यात पोहचण्यासाठी 36 तास लागतात. एवढ्या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील गोसे धरणाचे पाणी कमी करून हे संजय सरोवराचे पाणी सामावून घेतले जाऊ शकले असते. पूर परिस्थिती असलेल्या तिन्ही दिवसांत जिल्ह्यात पावसाचे पाणी अजिबात नव्हता. त्यामुळे केवळ धरणातून आलेल्या पाण्याचे नियोजन करायचे होते. मात्र ते नियोजनही या अधिकाऱ्यांना करता आले नाही आणि त्यामुळेच जिल्ह्यात महापूर आला.
हेही वाचा - कोष्टी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात; विणकरांना शासनाच्या मदतीची अपेक्षा
राजकीय लोकांच्या आरोप-प्रत्यारोपांविषयी जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्यांनी त्यांची संयमी भूमिका घेत पूर येण्यामागे विविध कारणे असून नेमके कारण कोणते, हे तपासावे लागेल. सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, असे सांगितले. तर भविष्यात अशा पद्धतीच्या पुराचा सामना करण्याची वेळ भंडारा जिल्ह्यावर येऊ नये, असे नियोजनही केले जाईल असे त्यांनी सांगितले.
पूर कशामुळे आला याविषयी आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राजकीय लोकांची रेलचेल सुरू झाली आहे. मात्र, या सर्व राजकीय आखाड्यामुळे पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या खरंच सुटतील का, याचा विचार राजकीय लोकांनी करावा, असे लोकांचे म्हणणे आहे.