भंडारा - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जागेच्या कमतरतेमुळे आणि अतिक्रमणांमुळे मागील दीड वर्षापासून थांबले आहे. अर्धवट असलेल्या या रस्ते बांधकामाला आता परवानगी मिळाली आहे. खासदार सुनील मेंढे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कंत्राटदार आणि नगरसेवक यांनी महामार्गाची पाहणी केली. दीड वर्षापासून रखडलेला राष्ट्रीय महामार्ग पुढच्या काही महिन्यात पूर्ण होईल, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
शहरातील जिल्हा परिषद चौक ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग बनण्याचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. दोन वर्षात हे काम भंडारा शहरापर्यंत पोहोचले. मात्र, त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी रस्त्याचे काम थांबवण्यात आले. विविध अडचणींना तोंड देत चार किलोमीटरचा रस्ता बनला. दूरसंचार विभागापासून रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून थांबलेले आहे.
हेही वाचा -शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात, आमदारांसह तिघे जखमी..
या मार्गावर काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे तर काही ठिकाणी लोकांची जागा या रस्त्या निर्मितीच्या कामात येत आहे. त्यामुळे 24 मीटरचा राष्ट्रीय महामार्ग हा 13 मीटरपर्यंतच रुंद राहिला. त्यामुळे अधिक जागा अधिग्रहीतकरून आणि अतिक्रमणे काढून रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला गेला. या दरम्यान रस्ता जास्त खराब झाला. अपघातांचे प्रमाणही वाढत गेले. अर्धवट पडलेला हा रस्ता लवकरात लवकर बनवावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी वाढली.
खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत अधिकारी आणि कंत्राटदारांसोबत मिळून रस्त्याचे पुन्हा मोजमाप केले. उपलब्ध असलेल्या जागेत रस्ता निर्मिती करण्याचे अधिकाऱ्यांनी आदेश कंत्राटदाराला दिले. मात्र, 24 मीटरचा राष्ट्रीय महामार्गाची रूंदी कुठे 18 मीटर तर कुठे 13 मीटर आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.