भंडारा - रणरणत्या उन्हापासून सुटका मिळवी म्हणून तुम्ही जर शिवशाही बसने प्रवास करीत असाल तर सावधान. कारण जर शिवशाही बसची वातानुकूलित यंत्रणा काम करीत नसल्यास हीच शिवशाही बस तुमच्यासाठी शिक्षा बनू शकते. असाच अनुभव भंडारा येथील प्रवाशांना आला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऊन चांगलेच तापले आहे. विदर्भात तर तापमानाचा पारा ४५ पर्यंत गेला आहे. त्यामुळे प्रत्येक जण या उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्याच्या सतत प्रयत्नात असतो. त्यातच बसने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे सध्या वातानुकूलित शिवशाही बसला प्राथमिकता देत आहेत. त्यासाठी अधिकचे पैसेसुद्धा देतात. मात्र, भंडारा येथील प्रवाशांना शिवशाही बसचा जो अनुभव आला तो खूपच वाईट आणि जीवावर बेतणारा होता.
नागपूर आगराची बस (क्रमांक एमएच-०६ बीडब्ल्यू - ०१३९) ही नागपूरवरून भंडारासाठी निघाली. दरम्यान, ती बस स्थानकावर थांबली असता वातानुकूलित सुरू होते. त्यामुळे प्रवासी गाडीत जाऊन बसले. मात्र, गाडी स्थानकावरून निघाल्यावर प्रवाश्यांना गरम वारा लागायला सुरूवात झाली. त्यानंतर तशी तक्रार त्यांनी चालकाला केली. मात्र, चालकाने एसी सुरू असल्याचे सांगत गाडी पुढे नेली. सतत गरम वारा येत असल्याने प्रवाशांनी गाडी परत बस स्थानकावर घेण्याची विनंती केली. मात्र, चालकाने गाडी परत जाणार नाही. तुम्हांला ज्यांना तक्रार करायची असेल त्यांना करा, असे सांगत गाडी भंडाराच्या दिशेने आणली.
दुपारची तापणारी ऊन, संपूर्णपणे बंद असलेली शिवशाही आणि त्यात बंद एसी यामुळे प्रवाशांना गर्मीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे चालकाजवळील बसच्या वरचा एक काच आणि दार दोन्ही उघडे करण्यात आले. मात्र, बसमध्ये बाहेचा वारा अजिबात येत नसल्याने प्रवाश्यांच्या घामाच्या लाटा निघत होते. लहान मुलांचा रडण्याचा आवाज येत होते. तर बीपीच्या रुग्णांनी औषध घेऊन भंडारापर्यंतचा प्रवास केला.
बसमधून उतरताच संतापलेल्या प्रवाशांनी बस स्थानकावरील अधिकाऱ्यांना गाठले. चालकांनी केलेल्या मनमानी कारभारामुळे कसा त्रास सहन करावा लागला, याची माहिती दिली आणि तशी लेखी तक्रारही दिली.
अधिकचे पैसे देऊन जर अशी शिक्षा देत असाल तर त्यापेक्षा या बस बंद करा. अन्यथा बसची देखरेख ठेवा, अशी मागणी प्रवाश्यांनी केली. अशा बंद बसमध्ये जर एखादा श्वासाचा त्रास असणारा किंवा दुसरा एखादा त्रास असलेल्या व्यक्तीला काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असेल, असा प्रश्न या गाडीत प्रवास करणाऱ्या एका डॉक्टरने केला.
गाडीतील एसी बंद असल्याची तक्रार मिळताच चालकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घ्यायला पाहिजे होते. या प्रवाशांची लेखी तक्रार घेतली आहे. ती नागपूरच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार, असे भंडारा येथील वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले.