भंडारा - 9 जानेवारी च्या मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर (SNCU) विभागात आग लागून ११ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेला १ वर्ष पूर्ण झाला आहे. या घटनेतील दोषींवर ठोस कारवाई न झाल्याने पीडित कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. तर, या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय अत्याधुनिक फायर यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज झाला आहे. लवकरच हे सुसज्य युनिट कार्यरत होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.
रात्री दोन वाजेच्या दरम्यान घडली घटना
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीला मध्यरात्री 2 च्या सुमारास रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिट विभागात आग लागून १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर, एका बालकााचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला होता. एकूण ११ नवजात बालकांना या दुर्दैवी घटनेत आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला. राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यापासून तर, विरोधी पक्ष नेते सर्वच नेत्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही अतिशय दुर्दैवी घटना असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी व आरोग्य मंत्र्यांनी दिले होते.
समिती गठीत केली गेली
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली. समितीने दिलेल्या अहवालानुसार, जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निलंबन करून त्यांची बदली करण्यात आली. तर, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर व दोन कंत्राटी नर्सेसवर कारवाई करण्यात आली. तब्बल ३९ दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सेसवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आमची कोणीही विचारपूस करत नाही
घटनेनंतर शासकीय आरोग्य कर्मचारी, इतर कर्मचारी आणि राजकीय लोक हे आमच्या घरी भेटीस आले. कुठलीही गरज लागली तर, मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र एक - दोन महिन्यानंतर यापैकी कोणीही येत नाही किंवा आमची विचारपूस करीत नाही. केवळ घटना घडल्यानंतर देखावा करण्यासाठी ही सर्व येतात. घटनेनंतर केवळ कंत्राटी कामगारांवर बडतर्फीची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. पण जे दोषी डॉक्टर आहेत त्यांच्यावर का गुन्हा दाखल करण्यात आला नाही? कुठेतरी सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करून दोषी डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पीडित मातांनी केला आहे. आम्हाला अपेक्षित न्याय मिळाला नाही. आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असे एका पीडित मातेने सांगितले.
कर्मचाऱ्यांची कमतरता होती
भंडारा रुग्णालय जाळीत प्रकरणात दोन नर्सेस या कर्तव्यावर असताना सुद्धा आऊट बॉर्न आणि इन बॉर्न या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे, या नर्सेसना आग लागल्याची माहिती लगेच मिळाली नाही, असे सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या संपूर्ण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. रुग्णालयात दोन बाळांच्या मागे एक नर्स असायला पाहिजे होती. मात्र, या ठिकाणी १७ बाळांच्या मागे दोनच नर्स कर्तव्यावर होत्या. त्यामुळे या कंत्राटी नर्सेसवर अन्याय झाले असल्याचे बोलले जात आहे.
घटनेनंतर रुग्णालय सुसज्ज
जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संपूर्ण रुग्णालयात अत्याधुनिक फायर सिस्टम बसविण्यात आले असून 70 च्या वर तापमान गेल्यास आपोआप स्प्रिंकलर सुरू होतील. तसेच, आतापर्यंत केवळ 250 किलो वॅटचे ट्रांसफॉर्मर होते. ते बदलून आता 650 किलोवॅटचे नवीन ट्रांसफॉर्मर बसविण्यात आले आहे. नवीन गॅस पाईप, नवीन व्हार्मर बसविण्यात आले असून नवीन इलेक्ट्रिक वायर बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या काही दिवसांत संपूर्ण यंत्रणा सुरू होणार आहे. आतापर्यंत दोनदा मॉकड्रील झाली असून भविष्यात अशा दुर्घटना झाल्यास आपली संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे सज्जे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.
हेही वाचा - MLA Raju Karemore Bail : रात्र तुरुंगात घातल्यानंतर आमदार राजू कारेमोरेंची सकाळी सुटका