भंडारा - जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. लॉकडाऊनचे नियमही लागू करण्यात आले आहेत. मात्र, रविवारी भंडारा शहराच्या बाहेर भरलेल्या मासोळी, मटण बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीत सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडविला होता. बाजारात लोकांनी केलेल्या गर्दीमुळे प्रशासनाचे सर्व नियोजन निष्फळ ठरल्याची परिस्थिती रविवारी भंडाऱ्यात पाहायला मिळाली. दुचाकी आणि चाराचाकीची गर्दी बघितल्यावर भंडारा शहरात संचारबंदी खरंच आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन नंतर भंडारा शहरातील मटनविक्री शहराबाहेरच्या बैल बाजारात केली जाते आहे. या ठिकाणी दररोज मटनविक्रीचा बाजार भरविला जातो. मात्र रविवारी मोकळ्या जागेवर सुद्धा नागरिकांनी प्रचंड गर्दी करून सोशल डिस्टनसिंगच्या आदेशाला केराची टोपली दाखविली.
मोकळी जागा असल्याने इथे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टनसिंग व्यवस्थितरित्या पालन केले जाईल. या उद्देशाने या बैल बाजाराच्या जागेवर हा मटनविक्रीचा बाजार भरविण्यात आला आहे. या ठिकाणी मासोळीचे दुकान एका रांगेत, मटणाचे दुकान एका रांगेत आणि चिकनचे दुकान एका रांगेत अशा पद्धतीने योग्य नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानुसार दुकानदार सुद्धा दिलेल्या जागेत बसले. मात्र, या ठिकाणी ठराविक अंतरावर उभे राहण्यासाठी चौकणी बॉक्स आखण्यात आले नव्हते. परिणामी अज्ञानी नागरिकांना स्वत: सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करायले हवे हे समजलेच नाही.
भंडारा शहरात सोशल डिस्टनसिंगचा कायदा लागू नसेल, अशी समज झाल्याने येथिल नागरिकांनी कोणतेच नियम पाळले नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले. तसेच संचारबंदी असूनही लोक या बाजारात चारचाकी घेऊन आल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. मात्र अशा प्रकारे नियमाचे तीन-तेरा वाजत राहिले तर भविष्यात कोरोनाचा शिरकाव व्हायला वेळ लागणार नाही.