भंडारा - शहरातील खात रोड वर वैशालीनगरचा मोठा परिसर आहे. यामध्ये राहणाऱ्या जवळपास 200 कुटुंबांच्या घरासमोर संध्याकाळनंतर भयावह अंधार पसरलेला असतो. कारण, घरासमोरील पथदिव्यांची सध्या बत्ती गुल झाली झाली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणारे जीव कधीही, कुठेही निघतात. मात्र, या काळोखात ते दिसून येत नाहीत. त्यामुळे, सूर्य मावळल्यानंतर नागरिक घराबाहेर निघणे टाळतायत. या विषयी नागरिकांनी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तक्रार दिली, तेव्हा त्या परिसरातील पथदिव्यांसाठीचे मीटर जळाल्याने नवीन मीटर लागेपर्यंत पथदिवे सुरू होणार नाहीत अशी माहिती मिळाली. त्याबरोबरच, हे मीटर आणण्यासाठी विद्युत विभागाकडे मागणी करावी लागेल, त्याची नोटीस काढली आहे असे सांगितले गेले.
मात्र, शासकीय पध्दतीने सुरू असलेल्या या कार्यवाहीमुळे बिचाऱ्या नागरिकांना या अंधाराचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढे अजून किती दिवस हा त्रास सहन करावा लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही.या विषयी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.