भंडारा- विधानसभा अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले हे पहिल्यांदाच त्यांच्या जन्म गावी काल (बुधवारी) आले होते. त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण होते. बच्चेकंपनी पासून ते वयोवृद्ध प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने नाना पटोले यांचे स्वागत केले. गावातून त्यांची मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला.
हेही वाचा- 'कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक'
नानांच्या स्वागतासाठी साकोली तालुक्यातील सुकडी गावात गावकऱ्यांनी सकाळपासूनच तोरण, पताके लावून घरासमोर रांगोळी काढली होती. नाना पटोले यांचे गावात आगमन होताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तयार होते. नानांनी प्रत्येकाचे स्वागत स्वीकारत गावातील प्रत्येक मंदिरात, बुद्ध विहारात जाऊन थोर महात्मे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नमन केले. संपूर्ण गावातून मिरवणूक काढून झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात नाना पटोले यांचा भव्यदिव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलतांना नाना पटोले यांनी सांगितले की, मी कोणावरी टीका टिप्पणी करू शकत नाही. कारण माझ्याकडे सर्वांना सारख्या दृष्टीकोनातून पाहून सारखा न्याय देण्याची जबाबदारी आहे. मात्र, याच जबाबदारीचे भान ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न, रुग्नालयाचे प्रश्न मार्गी लावण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.