भंडारा- जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता उत्कृष्ट गट स्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींना हा पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषदेतर्फे पुरस्कार दिला जात असला तरी या पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषदेचे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य गैरहजर होते.
भंडारा जिल्ह्यात एकूण ५४१ ग्रामपंचायत आहेत. यापैकी जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींना हा ग्रामस्वच्छता पुरस्कार देण्यात आला आहे. दरवर्षी उत्कृष्ट गट स्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद क्षेत्रापैकी प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील एक ग्रामपंचायतीची निवड केली जाते. ग्रामीण लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि गावात रोगराई पसरू नये स्वच्छता राहावी या उद्देशाने २० वर्षा अगोदर महाराष्ट्र शासनाने ग्राम स्वच्छता पुरस्कार योजनेची सुरुवात केली होती. प्रथम उत्कृष्ट गट स्तरीय पुरस्कार दिला जातो, नंतर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी तीन ग्रामपंचायतींची निवड होते. त्यानंतर विभागीय स्तरासाठी आणि राज्य स्तरासाठी ग्रामपंचायतीची निवड होते. आणि यामधूनच राज्यस्तरावरील उत्कृष्ट ग्रामस्वच्छता पुरस्काराची घोषणा केली जाते.
आज झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते ग्रामपंचायतीच्या सदस्यांना प्रशस्तीपत्र, फळझाड आणि ५० हजार रुपये रोख, असे बक्षिस देण्यात आले. खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पुरस्कार मिळत असल्यामुळे विजेते उत्साहित होते. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे दिनदर्शिकेचे उद्घाटन नाना पटोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नाना पटोले यांनी येत्या पाच वर्षात ग्रामीण क्षेत्राचा २०-२० प्रमाणे झपाट्याने विकास करण्याचा ध्येय ठेवल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारात मिळणारी रक्कम लहान की मोठी ही महत्त्वाची बाब नसून अशा पुरस्कार सोहळ्यामुळे ग्रामीण जनतेला स्वच्छतेबद्दल आपुलकी निर्माण होते आणि त्यामुळे गावाचे आरोग्य सुदृढ राहते, असे पटोले यांनी सांगितले. सरपंच हा गावचा आत्मा असतो त्यामुळे सरपंचाने गावाच्या दृष्टीने नेहमी चांगले निर्णय घ्यावे. त्यासाठी आपल्या पदाचा शक्य तेवढा चांगला वापर करावा, असेही नाना पटोले यांनी सांगितले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष, काँग्रेस अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे काही जिल्हा परिषद सदस्य सोडल्यास बहुतांश जिल्हा परिषद सदस्य गैरहजर होते.