भंडारा - जिल्ह्यातील बहुचर्चित साकोली मतदार संघातून राज्यमंत्री परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केले आहेत, तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करत वंचित आघाडी तर्फे नामांकन भरले आहे. सकोलीतील लढत रंगतदार होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे आमदार आणि राज्यमंत्री परिणय फुके यांनी मंगलमूर्ती सभागृहातून रॅली काढली. या रॅलीत खासदार सुनील मेंढे, आमदार बाळा काशिवार आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'मी या क्षेत्राचा पालकमंत्री आहे आणि विधानसभा सदस्यही आहे. मी आणि विद्यमान आमदार यांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी आणून कामे केली आहेत. मी जर निवडून आलो तर या क्षेत्राचा अजून विकास होईल. भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार संघातील लोक माझ्यासोबत असल्याने मी नक्कीच निवडून येईल', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - ईव्हीएम सुरू ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपची पडद्यामागे युती; वामन मेश्रामांचा घणाघात
नाना पटोले यांनी आपल्या कार्यकत्यांसह लहरी बाबा मठातून रॅली काढली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून आला. यावेळी नाना पटोले यांनी निवडणूक जिंकण्याबद्दल विश्वास व्यक्त केला.