भंडारा - गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेल्या लाखांदूर तालुक्यातील दयानंद शहारे यांचा २ मे ला वाढदिवस होता. मात्र, दुर्भाग्याने त्याच दिवशी दयानंद यांच्यावर घरच्यांनी अंत्यसंस्कार केले. केक भरविण्याच्या दिवशीच त्यांना मुखाग्नी द्यावी लागल्याने कुटुंबीयांसह उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
घरातील एकमेव कर्ता पुरुष असलेले दयानंद हे ३३ वर्षांचे होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. आईने काबाडकष्ट करून दयानंद यांना शिकविले. त्यांनी स्वतः मजुरी घरी हातभार लावला. मात्र देश सेवा करण्याची इच्छा मनात असल्याने त्यांनी पोलीस भरतीमध्ये परीक्षा दिल्या. सुरुवातीला ३ वेळा त्यांना अपयश आले. मात्र न थांबता जिद्दीने पुन्हा प्रयत्न केला आणि २०१४ मध्ये गडचिरोलीत पोलीस म्हणून रुजू झाले.
दयानंद यांना दोन मुली आहेत. एक मुलगी साडेतीन वर्षांची तर दुसरी मुलगी केवळ एक वर्षांची आहे. दयानंद यांच्या जाण्याने वृद्ध आई आणि पत्नी यांचा तर आधारच हरपला आहे.१ मे ला झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आणि २ मे ला त्यांचा वाढदिवस होता. आधी तर कधी कामावर सहकाऱ्यांसह तर कधी कुटुंबासह ते वाढदिवस साजरा करत होते. मात्र, गुरुवारी गडचिरोलीवरून त्यांचे पार्थिव दिघोरी येथे आणल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. मुलगा गेल्याने रडून रडून त्यांच्या आईच्या डोळ्यातील पाणीही आटले होते. सर्वत्र रडण्याचा आवाज आणि शहीद दयानंद अमर रहे चे नारे गुंजत होते. अश्रूपूर्ण डोळ्यांनी वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना शासकीय इतमामात मुखाग्नी देण्यात आली.