भंडारा - दिवाळीच्या काळात मोठा आवाज करणारी कार्बाइड गन प्रचंड प्रमाणात विकली गेली. प्लास्टिक पाईपच्या माध्यमातून तयार केलेल्या या गनचे दुष्परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. या गनचा वापर केल्यामुळे शेकडो लोकांच्या डोळ्यांना दुखापत झाल्याचा अंदाज आहे. काहींना पूर्ण अंधत्व व अंशत: अंधत्व आले आहे.
दिवाळीच्या पूर्वी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बाइड गन विक्रीसाठी आली होती. केवळ 150 ते 200 रुपयात ही गन लोकांना मिळाली. तसेच दिवाळीमध्ये आणि त्यानंतर शेतातील पिकाचे पशुपक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी कामात येईल, या उद्देशांनी मोठ्या प्रमाणात ही गन घेतली गेली. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये कार्बाईड गनची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. सुरुवातीला ही गन व्यवस्थित सुरू होती. काही दिवसानंतर बऱ्याच मुलांनी गनच्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही मुलांची कायमची दृष्टी गेली आहे. भंडारा जिल्ह्यात जवळपास शंभर मुलांच्या डोळ्यांना कार्बाईड गनमुळे दुखापत झाली असावी, असा नेत्रतज्ज्ञांचा अंदाज आहे.
प्लास्टिकच्या पाईपचा जुगाड करून बनविली जाते गन-
प्लास्टिकच्या पाइपला एकत्रित करून ही 'जुगाडू' गन बनविली गेली आहे. ही गन तांत्रिकदृष्ट्या अतिशय धोकादायक ठरत आहे. या गनच्या आतमध्ये कार्बाइडचा गोळा टाकल्यानंतर पाणी फवारले जाते. त्यांनतर त्याला आग लावली जाते. परंतु अनेकदा त्यातून आवाज येत नाही. त्यामुळे या गनजवळ काय झाले हे बघण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचवेळी स्फोट होऊन प्रचंड धूर निघतो. त्या धुरामुळे चेहरा विशेषतः डोळ्याला इजा होते.
हेही वाचा-महापरिनिर्वाण दिन : सकाळी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना शासकीय सलामी
या कार्बाइड गनपासून दूर राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला
नेत्रतज्ञ डॉ. दीपक नवखरे म्हणाले, की कार्बाइड गनमुळे डोळ्यांना झालेल्या जखमेवर कोणताही उपचार होत नाही. काही लोकांचे डोळे पूर्णतः दृष्टिहीन तर काही लोकांचे डोळे अंशत: दृष्टिहीन झालेले आहेत. त्यामुळे शक्यतोवर या कार्बाइड गनचा उपयोग टाळावा. विशेषता: लहान मुलांपासून कार्बाईड गन दूर ठेवावी, असा त्यांनी सल्ला दिला आहे.
हेही वाचा-मराठा आरक्षणाच्या स्थगितींनंतर अकरावीची अखेर दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
कान्द्री गावातील चार जणांच्या डोळ्यांना इजा
कान्द्री येथील योगेश कारेमोरे यांच्या डोळ्यांना गनमुळे इजा झाली आहे. त्यामुळे ही गन कोणी वापरू नका, असा ते सल्ला देतात. गावातील दुसरे ग्रामस्थ संजय भोंगाळे यांनी दिवाळीत आणलेल्या कार्बाईड गनचा वापर शेतात माकडे व रानडुक्करे हुसकाविण्यासाठी वापरला. मात्र, त्यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. कान्द्रीचे उपसरपंच परमेश्वर नागोपुलवार म्हणाले, की गावातील चार जणांच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. यामधील दोघांना अंशत: अंधत्व आले आहे. परिसरातील किमान 25 जणांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे उपसरपंच नागोपुलवार यांनी सांगितले.