भंडारा - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि सिल्ली गावातील एकूण 240 शेतकऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत नाव आसलेल्या शेतकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त करताना; डोक्यावरील कर्ज संपल्यामुळे शेतीत नव्या जोमाने काम करू, अशी प्रतिक्रिया दिली.
भंडारा जिल्ह्यात एकूण 35 हजार 325 लाभार्थ्यांची माहिती शासनाला पाठवण्यात आली. सोमवारपासून कर्जमुक्तीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि सिल्ली या दोन गावातील 240 शेतकऱ्यांच्या नावांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांची यादी 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. कर्जमुक्तीच्या यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना ते नाव प्रमाणित करण्यासाठी बँक व ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सेवा केंद्र जाऊन आधार कार्ड आणि अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. या प्रक्रियेनंतर शेतकरी कर्जमुक्त होऊन त्याचा सातबारा कोरा होणार आहे.
हेही वाचा... कर्जमाफीवर सरकार शेतकऱ्यांना वेड्यात काढतंय -देवेंद्र फडणवीस
शहापूर येथील कर्जमाफी झालेले शेतकरी काशीराम भुरे यांच्याकडे 3 एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी 59 हजार 900 रुपये कर्ज घेतले होते. मात्र, नापिकीमुळे त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. शासनाने त्यांचे कर्ज माफ केल्यामुळे ते आनंदी आहेत. कर्जमुक्त झाल्यामुळे नव्या जोमाने शेती करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काशीराम यांच्याप्रमाणेच शहापूर येथील सुरेश चव्हाण यांच्याकडील चार एकर शेतीवर त्यांनी एक लाख 70 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांचे संपूर्ण कर्ज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून माफ केले. त्यामुळे त्यांचाही सातबारा आता कोरा झाला. त्यामुळे शेतीत नवीन प्रयोग करून जास्तीत जास्त नफा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा... .. तर 'अंनिस' दाखल करणार इंदोरीकरांविरोधात तक्रार
शेतीसाठी लागणारा खर्च, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि सततची होणारी नापिकी याच्या कचाट्यात सापडल्याने आपण कर्ज फेडू शकलो नव्हतो. कर्ज कसे फेडावे, याची चिंता होती. मात्र, शासनाने आपली चिंता दूर केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
28 तारखेला उर्वरित शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध होणार असल्याचे सहाय्यक उपनिबंधक मनोज देशकर यांनी सांगितले. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून शेतकऱ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारी सेवा केंद्र किंवा बँकेत जाऊन स्वतःचे नाव प्रमाणित करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.