भंडारा - टोळधाड कीटकांच्या हल्ल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील पिपरी गावात मिथीमना सेपरेटा अळ्यांनी थैमान घातले आहे. या अळ्यांचा प्रादुर्भाव एवढा आहे, की केवळ 24 तासात मोठ्या झाडांचे संपूर्ण पाने या फस्त करतात. या अळ्यांमुळे पिपरी (पुनर्वसन)चे नागरिक भयभीत झाले आहेत. झाडांखाली असलेली दुकाने मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहेत. या विषयीची माहिती कृषी अधिकारी आणि ग्रामसेवकांना दिली असली, तरी केवळ पाहणी केली जाते. मात्र प्रत्यक्षात नियंत्रण मिळविण्यासाठी उपयोजना केल्या जात नाहीत. जर या अळ्यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, भविष्यात शेतातील पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भंडारा तालुक्यातील पिपरी (पुनर्वसन) येथे एका रात्री अळ्यांचा प्रादुर्भाव गावकऱ्यांना दिसून आला. या अळ्यांनी हायवेवरील करंजीच्या झाडावर बस्तान बसवले. एकाच रात्रीत त्या झाडावरील संपुर्ण पाने त्यांनी खावून टाकली. एका झाडांची पाने फस्त केल्यावर दुसऱ्या झाडावरचे पाने या अळ्या फस्त करत आहेत. हजारोच्या संख्येने असलेल्या या अळ्या केवळ 24 तासात एका मोठ्या झाडावरील संपुर्ण पाने खावून फस्त करतात. त्यामुळे या परिसरातील झाडावर फक्त आता फांद्याच दिसतात.
एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात या अळया आल्या तरी कुठून हे गावकऱ्यांना न समजण्यारे कोडे आहे. एकाच रात्रीच संपुर्ण झाडाची पाने फस्त केल्यामुळे पिपरी पुनर्वसन येथे हायवेवरील सर्वच दुकानदार घाबरुन गेले आहेत. त्यांनी आपली दुकाने या अळयांच्या भितीमुळे बंद केल आहेत.