भंडारा : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 8 ते 9 ऑगस्ट या दोन दिवसात भंडारा शहरात जनता कर्फ्यू असणार आहे. तसे पत्र गुरुवारी भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी काढले आहे. मागील पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच गुरुवारी भंडारा तालुक्यात तब्बल एकवीस नवे रुग्ण आढळले असल्याने हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. मात्र केवळ दोन दिवस जनता कर्फ्यू लावल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविणे शक्य होईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. हा जनता कर्फ्यू 2 पेक्षा जास्त दिवसांचा असावा अशीही मागणी नागरिक करीत आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ बर्याच अंशी कमी होती. मात्र, 200 चा टप्पा पार केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. त्यातच 2 ऑगस्ट या तारखेपासून ही संख्या दुपटीने वाढू लागली रविवारी 16, सोमवारी 18, मंगळवारी 16, बुधवारी 13, आणि गुरुवारी 24 असे एकूण 87 कोरोनाबाधित रुग्ण या पाच दिवसात आढळून आले. गुरुवारी आढळलेल्या 24 रुग्णांपैकी तब्बल 21 रुग्ण हे एकट्या भंडारा तालुक्यातील होते. त्यामुळे भंडारा शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुवारी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि आमदार यांची बैठक झाली. या सभेत 8 आणि 9 ऑगस्टला भंडारा शहरात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला गेला.
या दोन दिवसात अत्यावश्यक वस्तूंची दुकान वगळता इतर सर्व व्यापार बंद राहतील. नागरिकांनी त्यांच्या घरीच रहावे. केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडावे आणि या जनता कर्फ्यू ला 100 टक्के यशस्वी करावे अशी विनंती मुख्याधिकारी यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून यामध्ये डॉक्टर आणि आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत शहरात 15 नवीन कंटेन्मेंट क्षेत्र लावले गेले आहे. दोन दिवसाचा जनता कर्फ्यू लावला गेला असला तरी केवळ दोन दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवणे शक्य नसल्याचे हा जनता कर्फ्यू अजून वाढवावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रतिबंधित सर्व गोष्टींवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी ही नागरिकांतर्फे केली जात आहे.