भंडारा - जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी साकोली, तुमसर आणि भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे कुठे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, साकोली येथे वादळामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या दुकानांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे येत आहे.
पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. सोमवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह साकोली येथे हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. तर तुमसर तालुक्यातील माडगी येथे मध्यम स्वरूपाची गारपीट झाली आणि भंडारा तालुक्यातील पांढराबोडी येथे सुद्धा मध्यम स्वरूपाची गारपीट झाल्याची माहिती पुढे येत आहे. जवळपास बोरांच्या आकारा एवढी गारपिट होती. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे नेमके किती आणि कुठे नुकसान झाले याची माहिती सध्या उपलब्ध झाली नसली तरी भाजीपाला पिकांना याचा नुकसान होऊ शकतो.
मागील पाच दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे उकाड्याचा त्रास लोकांना सुरू झाला होता. आज आलेल्या पावसामुळे आणि गारपीटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही दिवसांसाठी का होईना सुटका मिळेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.