भंडारा - जिल्ह्यातील भंडारा ते पवनी महामार्ग विस्तारीकरणात तब्बल ४ हजारांच्यावर वृक्षांची कत्तल केली जात आहे. १०० वर्षे जुन्या या झाडांची कत्तल करू नये, तसेच त्यांचे संगोपन करण्याची मागणी ग्रीन हेरिटेज या संस्थेने केली आहे. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी झाडांभोवती मानवी साखळी करत शासनाला झाडे वाचवण्याचा संदेश दिला.
भंडारा ते पवनी या मार्गावर इंग्रजांनी १०० वर्षांपूर्वी कडुलिंबाच्या झाडांची लागवड केलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या वडाच्या आणि कडूलिंबाच्या रोपट्यांचे आता डेरेदार वृक्ष झालेले आहेत. उन्हाळ्यातही रस्त्यांवर झाडांमुळे हिरवळ दिसते. या झंडांवर अनेक पक्षांचे अधिवासही आहेत. ही झाडे तोडल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, शासनाने या हिरव्यागार मार्गाला विकासाच्या नावाखाली 'भकास महामार्ग' बनवल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
ही झाडे वाचवावी, या मागणीसाठी ग्रीन हेरिटेजच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. पवनी मार्गावर असलेल्या श्रीनगर गावातील गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. रस्त्यावर झाडांच्या सभोवताली मानवी साखळी बनवून शासनाला झाडे जगवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. मोठ्या वृक्षांना जीवनदान द्या, त्यांना वाचवा, पर्यावरणाचे जतन करून आमच्या येणाऱ्या पिढीलाही सुरक्षित राखा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
एकीकडे शासन ३३ कोटी वृक्ष लागवडीचे काम करीत असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे १०० वर्ष जुनी झाडे तोडून पर्यावरणाची हानी करत आहे. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, हा विकास पर्यावरणाला मारक असेल तर असा विकास आम्हला नको. रस्ते बांधा मात्र १०० वर्षे जुनी असलेली झाडे वाचवा, अशी मागणी ग्रीन हेरिटेजच्या कार्यकर्त्यांनी केली.