भंडारा - जिल्ह्यातील विविध भागात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे होळी दहनाच्या कार्यक्रमातही व्यत्ययआला होता.
जिल्ह्यात सर्वत्र होळीची तयारी सुरू असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसासह गारा पडल्या. जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात या गारा मोठ्या प्रमाणात बरसल्या. त्यामुळे शेतात असलेल्या हरभरा, मिर्ची आणि गहू या पिकांचेही मोठे नुकसान झाले.
सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अर्ध्या तासानंतर थांबला. यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, पुन्हा एका तासानंतर हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसला. विशेष म्हणजे मोहरी तालुक्यात पुन्हा तेवढ्याच जोमाने गारांसह मुसळधार बरसला. या पावसामुळे लोकांनी तयार केलेल्या होळीची लाकडे ओली झाल्यामुळे होलिका दहन करणे लोकांना शक्य होणार नसल्याने त्यांच्या आनंदावर विर्जन पडले. गारांमुळे नेमके किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, उद्यापर्यंत या नुकसानीची संपूर्ण आकडेवारी पुढे येईल, अशी माहिती नागरिकांनी दिली.