भंडारा - लाखनी तालुक्याच्या झरप गावातील जवळपास दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व लोकांना मुरमाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने काही लोकांवर शाळेमध्ये उपचार सुरू आहेत.
![लग्न समारंभातील अन्नातून 150 जणांना विषबाधा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-bhn-03-150-person-food-poison-vis-7203739_26022020230455_2602f_1582738495_569.jpg)
रुग्ण सध्या धोक्याबाहेर असून चार डॉक्टरांचा समूह आणि आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर उपचार करत आहेत. झरप गावातील जयराम कुरे यांच्या मुलीचा विवाह समारंभ होता. यानिमित्ताने जेवण ठेवण्यात आले होते. जेवण केल्यानंतर लोकांना हळूहळू उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे, अन्नातून गावकऱ्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. चार डॉक्टरांची टीम तयार करून या सर्व लोकांना मुरमाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
लोकांची संख्या जास्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची व्यवस्था होत नव्हती. तेव्हा गावातील जिल्हा परिषद शाळेत उर्वरित लोकांवर उपचार सुरू करण्यात आले. या रुग्णांमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांचादेखील समावेश आहे. या घटनेनंतर गावातील पाणी आणि अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच जिल्हास्तरावरुन विशेष वैद्यकीय पथक पाठविले जाणार आहे.
![लग्न समारंभातील अन्नातून 150 जणांना विषबाधा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-bhn-03-150-person-food-poison-vis-7203739_26022020230455_2602f_1582738495_104.jpg)